कॉलेज कट्टा: भाग 32

एखादा विजय मिळाला, यश मिळालं की, आपला आत्मविश्वास दुणावतो, एकदा का आत्मविश्वास दुणावला की कुठेतरी अहमला हात घातला जातो, त्याला ओलावा येतो, अहमला हात घातला की, ची बाधा आपोआप येते मग सुरु होतो तो अस्तित्वाचा झगडा. आजचा विषय अहंगंड कट्टा. याला दुसरा अतिशय चांगला अपशब्द म्हणजे फाजील आत्मविश्वास.

प्रत्येक महाविद्यालयात, वर्गावर्गांमधून असे काही विद्यार्थी असतात की, ज्यांना ग ची बाधा झालेली असतेच. त्यांना नेहमी असं वाटतं की हे जे चाललेले आहे, ते सगळं केवळ आपल्यामुळेच. आसपास, वर्गात, गावात, जगात जे काही घडतं ते फक्त आपल्यामुळे. किंवा जे चांगलं घडते ते आपल्यामुळेच घडलं पाहिजे. अशी यांची धारणा असते. अहम आणि गंड हे दोन शब्द अहम ब्रम्हासी करता करता मीच जग अशी मजल जाते.
आपल्या आसपास अशा पद्धतीचे विद्यार्थी बघायला मिळतात. जी अत्यंत सेल्फिश, स्वतः मध्ये रममाण होणारी, आपण म्हणजेच विश्व, असे म्हणणारे, हे जग आपल्याच मुळेच चालत आहे, असा गंड असणारे जे काही घडतं ते फक्त माझ्यामुळे अशी भावना ठेवणारे किंवा जे चांगलं होईल ते फक्त माझ्याच मुळे झाले पाहिजे अशी धारणा ठेवणारे विद्यार्थी आपल्या आसपास असतात. अशांची संख्या अत्यंत कमी असते. परंतु हे अत्यंत स्फोटक वृत्तीचे असतात. मीपणा ठासून भरलेला असतो. प्रत्येक गोष्टीत मी, मी, आणि मी असेच असते. म्हणजे कुठे स्पर्धेला जायचंय, मलाच जायचे, एखादे पद असेल तर ते मलाच हवे. आणि त्यामुळे सुरुवातीला लोक त्यांना मानतात. तसे हुशार असतात. बडबडी असतात, पण एकदा का ग ची बाधा झाली की मग त्यांना काही समजत नाही.

माझ्या पाहण्यात अशी खूप मुले आहेत की जी या ग च्या माध्यमातून विकारीत होऊन पुढे त्यांचे आयुष्य बरबाद झालेल आहे. फाजील आत्मविश्वासाची अनेक उदाहरणे देता येतील, उत्तम उदाहरण म्हणजे काही वर्षांपूर्वी कोंकणात सावित्री नदीला पूर आलेला असताना एसटी चालकाने केवळ फाजिल आत्मविश्वासापोटी एसटी बस त्या पुलावर घातली आणि बस वाहून गेली. कदाचित हे उदाहरण थोडे टोकाचं वाटेल पण ते सकारात्मकतेने घ्यायला हवे.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे नेहमी म्हणत असत की स्वप्न पहा
 स्वप्न पहा,
      स्वप्न पहा 
पण स्वप्न कुठली पहा जी आवाक्‍यात आहेत ती. स्वप्न पहा सहज उठला आणि एव्हरेस्ट ला गेला असं कसे होईल. नाही होणार.
कारण त्यासाठी प्रचंड मेहनत लागेल लागेल छातीचा भाता फुगवावा. त्याची तागद वाढवावी लागेल.
हळूहळू पहिला बेस मग दुसरा बीज कॅम्प. असं करत जावे लागेल.
पंगू लंघयते गिरीम...
अर्थात अशक्य काहीच नाही. सांगून एव्हरेस्टवर अपंग व्यक्ती चढलेली आहेतच की. पण ती कधी. ती प्रचंड मेहनतीच्या जीवावर. केवळ तोंडाच्या वाफा दवडून एव्हरेस्ट वर चढता येणार नाही. म्हणून स्वप्न बघताना ती आवाक्यातली स्वप्न बघितली पाहिजेत माझ्या शारीरिक क्षमतांचा, बौद्धिक क्षमतांचा, विचार करून मगच पुढे जाता आले पाहिजे. आणि मग स्वप्न साकार करता आली पाहिजेत. मोठी स्वप्न बघा हे मान्यच. पण किती मोठी? याचा मात्र विचार केला पाहिजे !!! आत्मविश्वास पाहिजेच, पण किती? अति वा फाजील मुळीच असता कामा नये !!! 

वास्तविक आपले आपल्याला कळायला लागतात आपण फाजील आत्मविश्वास तर बाळगत नाही ना? आपण गंडाने पछाडलेले तर नाही? आपला अहम तर आपल्याला आडवा येत नाही? याची सुरुवात कुठून होते तर यश मिळाल्यानंतर. ते पचवता आले नाही की. खरं तर आपली नाळ मातीशी असली पहिजे. म्हणजे काय ? आपण सहज म्हणतो, तो हवेत गेलाय! यशाने माणसांनी हुरळून जाऊ नये. आणि अपयशाने खचून जाऊ नये! इतकं सोपं गणित आहे. जमलं पाहिजे. दुसऱ्याचे काहीही चांगलं झालं तरी ते मीच केलं... तो मीच जेव्हा येतो तेव्हा आपण कुठेतरी मागे पडायला सुरुवात होते. आणि म्हणून हे कळायला हवे की मी, मी मधे तर अडकलो नाही ना!? मी अहं चा नादी तर लागलो नाही ना? मला ग ची बाधा तर झाली नाही ना? वास्तविक हा अस्तित्वाचा झगडा असतो.

मला फार आश्चर्य वाटतं जेव्हा पहिली, दुसरी, तिसरी वा चौथी तील मुलाचे पालक मुलाचं यश फ्लेक्स द्वारे झळकवतात, जगभर पसरवतात. अशाने यश मुलाच्या डोक्यात जात. त्याला एकदम मोठा झाल्याचा आव येतो लाडात वाढलेली अति आत्मविश्वास असलेली ही मुलं नंतर अत्यंत अपयशी होतात.

आयुष्यात काहीच करत नाहीत? काही करू शकत नाही? म्हणून यश पचवता आले पाहिजे !!!!!
आपलंही आणि दुसऱ्याचे. या बाबतीत सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचे उत्तम उदाहरण आहे. सचिन नी यशही पचवलं आणि अपयशही पचवले. वास्तविक तांत्रिकदृष्ट्या विनोद कांबळी हा उत्कृष्ट क्रिकेटपटू परंतु यश डोक्यात गेलं आणि अपयश पचवता न आल्याने विनोद कांबळी कुठे मागे पडला? हे कोणालाही कळले नाही.

सर सुनील गावस्कर यांनी योग्य वेळी एक्झिट घेतली. सचिन योग्य वेळी एक्झिट घेतली. दोघानी तेच केलं डोक्यात नाही घेतलं. या बाबतीत मला धोनी भयानक आवडतो. म्हणून तर त्याला कॅप्टन कूल म्हणतात. प्रत्येक परिस्थितीत अत्यंत शांत असायचा तरी यश कधीही डोक्यात जाऊ दिले नाही. धोनी चे उदाहरण यासाठी की तो कायम यशाचं श्रेय दुसऱ्याला देत गेला. विश्वचषक जिंकल्यावर क्षणभर विश्वचषक हातात घेतला, लगेच दुसऱ्याच्या हातात देऊन मोकळा झाला. किंवा सगळं श्रेय सचिनला देऊन मोकळा झाला. याला मोठेपणा म्हणतात. गोष्ट आपणच करायची पण त्याचं श्रेय दुसऱ्याला आणि दुसऱ्याच्या नावावर खपवू याला मोठेपणा म्हणतात. दुसऱ्याचे यश आपल्या नावावर घेणारी हजारो माणसं असतात ती जगात नंतरच्या काळात टिकत नाहीत...
आपले यशही दुसऱ्याच्या नावावर सांगणारी माणसं आयुष्यात खूप मोठी होतात. अति फाजील आत्मविश्वास आला की, दोष काय होतो की, मला येन, केन, प्रकारेण, साम-दाम-दंड-भेद जिंकायचं आहे म्हणून, माणसं काय वाटेल ते करायला लागतात, आणि मग त्यांच्या हातून चुका होतात. दुसऱ्याचेही यश माझं हे सांगण्यासाठी धडपड करतात. नसलेले यश पदरी पाडून घेण्यासाठी प्रवास सुरू होतो तो अपयशाच...

यशामध्ये रूपांतर करण्यासाठी या माणसांना अपयश पचवता येत नाही. यांना दुसऱ्याचे यश बघवतच नाही. मीच कायम पहिले पाहिजे यासाठी धडपड सुरू होते आणि यातून एक दुष्टचक्र सुरू होते आणि इथे घोटाळा होतो. हा अहंगंडचा अति विश्वासाचा, फाजील आत्मविश्वासाचा, एक घातक परिणाम असतो.
क्रिकेटचेच उदाहरण घ्यायचं ठरलं तर नाव न घेता आपण सांगू शकतो की क्रिकेटमध्ये काही लोकांनी जे स्लेजिंग अतिप्रमाणात केलं किंवा मॅच फिक्सिंग केल्या ही माणसं खड्यासारखे निवडून बाहेर पडले. उशीर होतो पण यांना बाहेर पडावंच लागतं. सिस्टीम च्या बाहेर पडावंच लागतं.

यासाठी एकच पर्याय यश पचवता आले पाहिजे. तसेच अपयश पचवताही आले पाहिजे. यापेक्षा महत्त्वाचं काय तर दुसऱ्याच्या यशात आपलं यश सामावले पाहिजे. दुसऱ्याचा यशाचं कौतुक करता आलं पाहिजे ब्युटी ॲप्रिसिएशन करताच आले पाहिजे. मीच मोठा मी चांगला मीच महान ,,, मी मी आणि मी याच्यापुढे जग आहे हे कळले पाहिजे.

मला कधीतरी स्वप्न पडतं की आपण प्लुटो वर गेलो. जाताना मध्ये शुक्र, शनि, बुध, गुरु सगळे भेटले आणि परत आलो. येताना जाणीव झाली कि आपण आपण किती नगण्य आहोत क्षणभंगुर आहे हे सगळं. आपण तिळमात्र सुद्धा नाही. या सूर्यमाला आकाशगंगा आणि एकुणातच स्पेस या कन्सेप्ट मध्ये आपले स्थान ते किती? छाती उघडी ठेवून ती फुगवत चालणं म्हणजे अस्तित्व का? अस्तित्व हे नेहमी बोलक्या चेहर्‍याने समजले पाहिजे. आपल्या मेंदूत काय दडलंय हे थोबाडं नावाच्या अवयवातन बाहेर आले पाहिजे. त्याला अस्तित्व म्हणतात. ज्याला समजलं तो मोठा. अत्यंत कमी शब्दात आपलं अस्तित्व दाखवता येते.

जीवन अत्यंत क्षणभंगुर आहे. आपण कसला आत्मविश्वास बाळगतो किती फाजीलपणा करतो कोणाच्या जीवावर जगतो माणसं क्रेडिट घेण्यासाठी किती हपापलेपणा करतात आपणही तेच करतो का? संशोधनांमध्ये एक नियम आहे तो नियम ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्यांचे त्यांचे आभार मानणे acknoledge करणे. हा सृष्टीचा नियम आहे. आणि म्हणून आपल्याला इतरांचे आभार मानता आले पाहिजे. माझ्या जगण्यामध्ये प्रत्येक घटकांनी जी भूमिका पार पडली त्या भूमिकेला मला सलाम करता आला पाहिजे!!! मी एकटा काहीच करू शकत नाही. हे ज्याला समजते तो माणूस मोठा. आणि म्हणून लेट्स काँग्रेट्स हे आपल्याला जमले पाहिजे इतरांचे आभार मानणे त्यात कमीपणा नव्हे हा खरं तर मोठेपणा. इतरांचे कौतुक करणं याला मनाची उभारी लागते. एक म्हण मला नेहमी आठवते जी विना गव्हाणकर यांनी वापरलेली आहे.
हाताखालची माणसे मोठी करा की तुम्हाला उद्या मोठी करतील सहकारी म्हणून आपण इतरांना मोठ् केले पाहिजे. इतरांचे कौतुक केले पाहिजे.
    आपल्याला समजून घेऊयात मला माझी ऊर्जा कळू देत अशी प्रार्थना करून... धन्यवाद

ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य: कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य: अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या