अन...जेंव्हा पेमगिरीतील भिंतीही बोलू लागतात

बाळासाहेब भोर / संगमनेर : ऐतिहासिक व नैसर्गिक वैभवप्राप्त स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीच्या भिंती आता बोलक्या दिसू लागल्या आहेत. गावात प्रवेश केल्यानंतर खरोखरच मन प्रसन्न व एक प्रकारची ऊर्जा प्राप्त झाल्यासारखं वाटतं.

पेमगिरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, जल संधारण, पाण्याचे महत्व, स्वछता संदेश अशा विविध पर्यावरणातील मानवी जीवनाशी निगडित असलेल्या गोष्टींचे महत्व लोकांना पटवून देण्यासाठी गावातील भिंतीवर घोषवाक्य, चित्र अप्रतिम कलाकृती साकारण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेलं तापमान, जंगलतोड, पाण्याचा होणारा अपव्यय, वाढते प्रदूषण या गोष्टी टाळण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी महत्वपूर्ण ठरणार आहे. आज प्रत्येक गावातील भींती अशा पर्यावरण विषयक घोषवाक्यांनी बोलू लागल्या तर आत्ता शाळेत शिकणारी मुलं गावातून जाताना भिंतीवर लिहिलेला आशय वाचून या गोष्टींचे नक्कीच अनुकरण करतील. त्यावेळी मग निसर्गही मानवाशी मनसोक्त बोलू लागेल यात तिळमात्र शंका नाही.

पेमगिरी गावच्या तीनही बाजुंनी असलेले डोंगर, मोठया प्रमाणात असलेलं जंगलक्षेत्र, पावसाळ्यात खळखळून वाहणारे धबधबे, पेमगिरीचा ऐतिहासिक शहागड, महाकाय वटवृक्ष अशा प्रकारे निसर्गाने मनसोक्त आपल्या रूपांची उधळण केलेल्या पेमगिरीतील भिंतीही आता बोलक्या झाल्याने गावाने समृद्धीची वाट पकडली आहे. फक्त भविष्यात त्याप्रमाणे मार्गक्रमण व प्रभावी अंमलबजावणी केली तर गावचा कायापालट नक्कीच होईल.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या