एकात्मिक शेती पद्धती काळाची गरज - नारायण निबे

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : एकात्मिक शेती पद्धती हि काळाची गरज असल्याचे मत श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने चे कृषि विद्या विभागाचे विशेषज्ञ नारायण निबे यांनी सांगितले. बख्तरपूर ता. शेवगाव येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रकाश बहिरट, कार्यक्रम सहाय्यक, के.व्ही.के. दहिगाव ने, श्री. निलेश भागवत बी.टी.एम. आत्मा तसेच कृषि सह्हायक श्री. चव्हाण हे उपस्थित होते.

सदर प्रशिक्षणात बोलताना ते म्हणाले अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना शेतीपासून मिळणाऱ्या उत्पादनाबर कुटुंबाचा चरितार्थ चालविणे कठीण होत चालले आहे. प्रत्येक पिढीला जमीन कमी होत चालली आहे. त्यामुळे यांत्रिक शेती, ट्रॅक्टर, सुधारीत अवजारे कमी क्षेत्रासाठी वापरणे त्याला शक्य होत नाही. वर्षानुवर्षे प्रचलित पिके घेणे परवडत नाही. परंपरेनुसार उत्पन्नासाठी नुसत्याच पिकावर अवलंबून राहिल्याने शेती करणे जोखमीचे ठरत आहे. शेतीतील धोके ओळखून शेतीला पुरक घटकांचा विचार केला पाहिजे. गरीब आणि आर्थिक दृष्टया कमकुवत शेतकऱ्यांना शेतीला लागणाऱ्या निविष्ठा घेणे मुश्किल होत आहे.

एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेला शेतकरी नुसता शेतीवर अवलंबुन राहण्याचा धोका पत्कारु शकत नाही. त्यांच्या कुटंबातील ४ ते ५ सदस्यांची अन्नसुरक्षा त्यांना वर्षभर खात्रीशीर उत्पन्न मिळण्याची शाश्वती, कुटुंबाला सकस आणि संतुलित आहाराची हमी, कुटुंबाचे जीवनमान आणि आर्थिकस्तर उंचावण्यासाठी उपलब्ध साधन सामुग्रीचा कार्यक्षम वापर केला पाहिजे. एकात्मिक शेती पद्धती ही त्यासाठी उपयुक्त ठरत असुन यातील सर्वघटक एकमेकाला पुरक आहेत. एका घटकाचे उत्पन्न अथवा अवशेष दुसऱ्या घटकाचे निविष्ठेसाठी उपयुक्त ठरते. पिकांचे अवशेष पुन्हा वापरणे शक्य ठरत आहे. एकात्मिक शेती पद्धतीने जमिनीची सुपिकता निश्चित वाढली जाते. यामध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये फायदा झाल्याचे दिसून आले आहे. ही एक साखळी पद्धतीची शेती आहे. गरीबीतून वर येण्याचा हा कार्यक्रम आहे.

एकात्मिक शेती पद्धतीमध्ये दुग्धव्यवसाय, फळबाग, ग्रीनहाऊस, भाजीपाला, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यशेती, गांडुळखत प्रकल्प व शेतमाल प्रक्रिया यासारख्या शेतीपुरक जोडधंद्याचा विचार केला पाहिजे. शेतकरी शेती करत असलेल्या भागातील हवामान, जमीन, पाण्याची उपलब्धता, शेतमाल विक्रीसाठी जवळची बाजारपेठ, शेतमालाला असलेली मागणी उपलब्ध साधणांचा कार्यक्षम वापर यांचा अभ्यास करून शेती पद्धती प्रारूप तयार करावे. शेतीचा व्यवसाय किफायतशीर होऊन रोजगार या प्रारूपातून उपलब्ध होऊ शकतो. गरीब शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर आणि जीवनमान उंचावण्याचा हा एक प्रयत्न आहे.

यावेळी प्रकाश बहिरट यांनी माती पाणी परीक्षण आणि त्यानुसार एकात्मिक पद्धतीने खतांचा वापर या विषयी माहिती दिली. आत्मा विभागाच्या विविध योजना विषयी निलेश भागवत तर महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या विविध योजनांची श्री. चव्हाण यांनी माहिती दिली. कार्यक्रमास बख्तरपूर येथील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यास केंद्राचे दत्ता वंजारी, संजय थोटे यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या