बानगुडे पाटील यांनी शिवरायांचा इतिहास लपवण्याचा प्रयत्न करू नये- थोरात

अहमदनगर/ जावेद शेख : संपूर्ण बहुजन समाजाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे यांनी छत्रपतींचा खरा इतिहास लपवण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केले आहे.

सुरेंद्र थोरात यांनी म्हटले आहे की, इतिहासाचे अभ्यासक व प्रसिद्ध व्याख्याते असा लौकिक असणारे प्रा. बानगुडे हे नुकतेच राहुरी तालुक्यात कार्यक्रमासाठी आले होते. मात्र या कार्यक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगताना बानगुडे पाटील यांनी छत्रपतींचा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनाचे व रयतेचे खरे राजे होते. राजांचे दरबारी सर्व जाती धर्माचे मावळे होते. छत्रपती शिवरायांनी प्रत्येक जाती धर्माच्या मावळ्यांवर जिवापाड प्रेम केले. प्रा. बानगुडे मात्र इतिहास सांगताना छत्रपती केवळ मुस्लिमांचे विरोधक होते किंवा मुस्लीम त्यांचे विरोधक होते असाच भास निर्माण करतात.

वास्तविक पाहता अफजल खानाच्या वधाच्या वेळेस शिवरायांवर वार करणाऱ्या व्यक्तीचा नामोल्लेख पिढीला कळायला पाहिजे, शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या लोकांची प्रवृत्ती भावी पिढीला कळली पाहिजे, यासाठी शिवराज्यभिषेक कथन करणे गरजेचे आहे, शिवरायांच्या राज्याभिषेकाला कोणी विरोध केला?राज्याभिषेकासाठी काशी वरून गुरु का आणावे लागले? या गोष्टी नवीन पिढीला सांगितले पाहिजे. मात्र बानगुडे पाटील या सर्व गोष्टी जाणून-बुजून लपवत असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे विरोधक मुळीच नव्हते. त्यांनी आपल्या मुस्लिम मावळ्यांसाठी मस्जिद निर्माण केल्याचेही सांगितले पाहिजे, कुराण या ग्रंथाचा ते कसा आदर करीत होते हे सुद्धा लोकांना सांगितले पाहिजे.   मात्र अत्यंत स्वतः खुप भावनिक झाल्याचे भासवत प्रा. बानगुडे खऱ्या इतिहासाला बगल देत असल्याचे निदर्शनास आले आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणे हा आपण व्यवसाय म्हणून अंगीकारले त्याला आमची हरकत असण्याचे कारण नाही. मात्र क्षणिक समाधान मिळवण्यासाठी छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास लपवण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन थोरात यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या