बाळकृष्ण भोसले
राहुरी - गत तीन वर्षाच्या कोरोना महामारीने निर्बंधाच्या विळख्यात असलेल्या भटक्यांची पंढरी म्हणून देशपरदेशात ओळख असलेल्या 'मढी' च्या दिंड्यांनी महामार्गासह ग्रामीण रस्ते अक्षरशः फुलून गेले आहेत. भजन कीर्तनात लिन होत लहानथोर भाविकात यंदा प्रचंड उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
व्हिडिओ पहा :-वर्षातून एकदा सगेसोयरे, नातेवाईक, आप्तेष्ठांची भेट होत असलेल्या व गाढवांचा बाजार, भटक्यांच्या जातपंचायती यासाठी सर्वदूर ओळख असलेल्या मढीची यात्रा दरवर्षीप्रमाणे रंगपंचमीला भरते राज्यातील व राज्याबाहेरील तसेच परदेशातील भाविकांची मांदियाळी या यात्रेत प्रकर्षांने जाणवते. गोरगरीब भाविकांसह श्रीमंतांची हजेरीही या यात्रेत हमखास जाणवते.
२०१९ च्या मार्च महिन्यात कोरोनाने कहर केला नि अख्ख जगच घरात बंदिस्त झालं. जमावबंदी, संचारबंदी घोषित झाली तर भितीच्या सावटाने गावची गाव ओस पडली. नातलगांबरोबर मित्र परिवार एकमेकांकडे संशयाने पहू लागला. नवऱ्याला कोरोना झाला तर बायको त्याच्या जवळ जाईना इतकी भयावह परिस्थिती पहावयास मिळाली. या महामारीने स्मशानं कधी नव्हे ती कायम जळत राहिली. एरवी स्मशानाचा तिरस्कार करणारी मंडळी स्मशानातच ताटकळत राहिली, महामारीत कुणाची आई, कुणाचा बाप, मुलगा तर कुणाची मुलगी गेल्याने एकुणच समाजचं पोरका झाला.
अशा पार्श्वभूमीवर गावागावातील जत्राखेत्रांवरही बंदी आली. पर्यायाने भाविकांबरोबर छोटेमोठे व्यवसायांवर निर्बंध आले. वर्षातून एकदा जत्रेच्या निमित्ताने एकत्र येणारे सगेसोयरे एकमेकांना कोरोनाने परके केले. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव जरा कमी झाल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आणि गावखेड्यासह मोठ्या यात्रा भरण्यास सुरुवात झाली.
रंगपंचमीच्या दिवशी तमाम भटक्यांचे श्रध्दास्थान असलेल्या मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या प्रसिद्ध अशा मढीची यात्रा भरते. या यात्रेसाठी राज्यभरातील अठरा पगड जाती आपापल्या नातेवाईकांसह एकत्र येतात. त्यात एकमेकांची सुख:दुखाबरोबरच वर्षातील आढावा सोयरिकी, भांडणतंटे आदी सामाजिक प्रश्नांची सोडवणूक यानिमित्ताने होते तर जगप्रसिद्ध एकमेव गाढवांचा बाजार येथे भरत असून यातून मोठी उलाढाल होत असते तर जातपंचायतींचे मोठे केंद्र म्हणूनही मढीची पुर्वापार ओळख आहे.
या यात्रेच्या साधारण महिनाभर आधीच भाविकांना मढीची ओढ लागली असते. मग कानाकोपऱ्यातून असंख्य दिंड्या मढीच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसतात. काही पुर्वनियोजित तर काही अचानक चालू लागतात. यंदा कोरोना काळात अबोल झालेले रस्ते या दिंड्यांनी सहज बोलके झाल्याचे चित्र आहे. अंधारात, ऊन्हातान्हात कधीही दिंड्या सुरू असतात. रस्त्यात अनेक नागरिक स्वतः हून या दिंड्या वळवून घेत त्यांना चहानाश्ता जेवणाची व्यवस्था करताना दिसतात तर अखंड भजनाने एकंदरच प्रचंड धास्तीखाली असणारं वातावरण हलकंफुलकं झाल्याचा अनुभव यानिमित्ताने येत असल्याच्या प्रतिक्रिया दिंडीतील भाविकांबरोबरच समाज मनातून उमटत आहेत.
0 टिप्पण्या