साहेब माझे पिक व शेत वाचवा; शेतकऱ्याचे उपविभागीय अभियंत्याला साकडे


◾कालवा गळतीचे पाणी घुसले शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात

विलास लाटे /पैठण : पैठण तालुक्यातील ववा येथे कालवा गळतीमुळे कालव्यालगत असलेल्या एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात पाणी घुसल्याने मोठे नुकसान होत आहे. परीणामी ऊसतोड मिळत नसल्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याने शिवना टाकळी कालवा उपविभाग क्रं.२ चे उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयात निवेदन देवून 'साहेब माझे पिक व शेत वाचवा' असे साकडे नुकतेच निवेदन देवून घातले आहे.

बाबुराव देवराव ढोकळे या शेतकऱ्याची तालुक्यातील ववा शिवारात चार एकर जमीन आहे. या जमिनीत त्यांनी ऊस व मोसंबीचे पिक घेतले आहे. जायकवाडी धरण ते खेर्डा प्रकल्पात जाणारा कालवा या जमीनीलगतच गेलेला आहे. मात्र, शिवना टाकळी कालवा उपविभाग क्र.२ या योजनेतून या कालव्याचे काम दोन वर्षापासून अपूर्ण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होवून पाण्याचा अपव्यय होत आहे. याचा नाहक फटका बाबुराव ढोकळे या शेकऱ्यास बसत आहे. जेव्हा या कालव्याला पाणी सोडले जाते. तेव्हा ढोकळे यांच्या शेतात कालव्याचे पाणी झिरपुन संपूर्ण शेत पाण्याखाली जाते. साचलेल्या पाण्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. सद्यस्थितीत ऊस तोडणीला आला आहे. मात्र, कालवा गळतीचे पाणी शेतात साचल्यामुळे कोणतेच वाहन शेतात जात नसल्याने, ऊस तोडणी अभावी शेतात तसाच पडून आहे. या सततच्या त्रासामुळे शेतकरी वैतागला असून उपजीविका असलेले हे एकमेव शेत पाणीगळतीच्या विळख्यात सापडले आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढुन माझे पिक व शेत वाचवा अशी कळकळीची विनवणी या शेतकऱ्याने उपविभागीय अभियंता यांना निवेदनातून केली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असलेले हे वाचले नाही तर माझ्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही असे संकेत ही या शेतकऱ्याने निवेदनातून दिले आहे.

    

दोन एकर ऊस, दोन एकर मोसंबी व सध्या आमचे घर सुद्धा पाण्यात आहे. काय करावे कळत नाही. कालव्याच्या साईडला काळी मातीचा भराव न टाकल्यामुळे कालव्यातून पाणी बाहेर निघत आहे. दोन वर्षापासून माझी शेती पाण्यात जात आहे. चार एकर शेती ही पाण्यात आहे. कालवा गळतीमुळे ऊसाला सुद्धा तोड मिळेना. दोन एकर मोसंबी सुद्धा पाण्यात गेली आहे. शेती कशी करावी असा प्रश्न पडला आहे.

- बाबुराव ढोकळे, शेतकरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या