दरोड्याच्या तयारीतील आरोपी राहुरी पोलिसांनी केले जेरबंद, गुहातील दोघांचा समावेश

राहुरी / बाळकृष्ण भोसले - दरोड्याच्या तयारीतील आरोपींना राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाने रविवारी पहाटे राहुरी कारखाना परिसरात अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान त्यांच्याकडून सत्तूर, चाकू, मिरची पुडसह ९० हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राहुरी कारखाना परिसरातील गुंजाळ नाक्याजवळ रविवारी पहाटे पावणे सहाच्या समारास अज्ञात व्यक्ती संशयास्पद हालचाली करत आहेत. माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी आपल्या सहकाऱ्यासह समवेत सदर ठिकाणी छापा मारला असता आरोपी समीर हंसराज शेख (३९) रा. गुहा ता. राहरी, कय्युम आब्बास शेख (२८) रा. लोहगाव पुणे, गणेश नामदेव कोरडे (३५) रा. हिंगणगाव ता. जि. अहमदनगर, अजय जॉन ओहोळ (२५) रा. गुहा ता. राहुरी, दिपक रामनाथ पवार (१९) रा. नांदगाव ता. जि. अहमदनगर असे आढळून आले. त्यांच्याकडून लाल काळ्या रंगाची एच.एफ. डिलक्स व काळ्या रंगाची आणखी एक डिस्कव्हर अशा दोन विना क्रमांकाच्या दुचाक्या बरोबरच सत्तूर, धारदार चाकू, मिरचीची पुड, वस्तरा असा जवळपास ९० हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

तालुक्यात मागील काही दिवसांपासून विविध ठिकाणी चोरट्यांनी जबरी चोऱ्या केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या