पेमगिरीत सततच्या खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी चिंतेत

संगमनेर : तालुक्यातील पेमगिरीत सध्या शेतीसाठी विद्युत पंपाला एक आठवडा दिवसा तर एक आठवडा रात्रीचा वीजपुरवठा सुरु आहे. आता कडक उन्हाळा सुरु झाल्याने भाजीपाला तसेच चारा पिकांना वेळेवर पाणी आवश्यक आहे. परंतु या आठवड्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने मागास कांदा, गहू, हरभरा या रब्बी पिकांना वेळेवर पाणी उपलब्ध नसल्याने पिकं करपू लागली आहेत.

या आठवड्यात चार-पाच दिवस उन्हाची तीव्र स्वरूपाची लाट तसेच उष्ण व दमट हवामानामुळे पिके अक्षरशः होरपळून गेली आहेत. चारा पिकांचीही तीच अवस्था आहे. पेमगिरी परिसरातील मातीचा पोत हा मध्यम भुरकड, तसेच निचऱ्याची जमीन असल्यामुळे पिकांना पाणी जास्त लागते ही वस्तुस्थिती आहे. पण महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटिला आला आहे. दिवसभरात जेवढा वेळ विद्युत पुरवठा खंडित केला जातोय तेवढी वाढीव तास वीज देण्यासाठीही महावितरण सहमती दर्शवत नाही हिच मोठी शोकांतिका आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पेमगिरीत महावितरणचे सबस्टेशन असूनही वीज पुरवठ्याबाबत अशी अवस्था असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. 

दिवसभर वरुन आग ओकणारा सूर्य व सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्याला शेतातून विहीरीपर्यंत असंख्य चकरा माराव्या लागल्याने तो हतबल झाला आहे. अगोदरच सततचे खराब हवामान, अवकाळी, खतं औषधांच्या वाढत्या किंमती, शेतमालाचे घसरलेले बाजारभाव व त्यात आणखी भर म्हणजे महावितरणच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांची अवस्था आगीतुन उठून फोफोट्यात पडल्यासारखी झाली आहे.

  " महावितरणने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये, अन्यथा कायदेशीर मार्गाने हिसका दाखवून देऊ".
  _ बाळासाहेब भोर; अ.भा.क्रांतीसेना, संगमनेर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या