संगमनेर शहर - अकोले तालुक्यातील जनतेने पाच वर्षापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जो विश्वास दाखऊन पंचायत समितीच्या माध्यमातून अकोले तालुक्यात काम करण्याची संधी ज्या विश्वासाने दिली त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही. विकास कामांच्या माध्यमातून सर्वच गावांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे प्रदीपादन मारुती मेंगाळ यांनी केले.
अकोले तालुक्यातील विठे येथे त्यांच्या स्थानिक विकास निधीतून तसेच पंचायत समिती सेस 15 वित्त आयोग मधून विठे ठाकरवाडी येथे कॉंक्रीटीकरण तसेच चिंचमाळी येथे रस्ता सुधार करणे या कामांचे भूमिपूजन होते त्या प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की 2017 साली राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. तत्कालीन भाजप सरकारच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचे बहुतेक अधिकार काढून घेतले होते. विकास कामे करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी नसल्याने या पंचायत राज मधील स्थानिक विकास संस्था मोडकळीस आल्या होत्या. तत्कालीन भाजप सरकारने 14 वित्त आयोग ही योजना अंमलात आणल्याने या योजनेचा निधी थेट लोकसंख्येच्या तुलनेत ग्रामपंचायतींना जात असल्याने या गटातील / गणातील जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना गेली चार वर्षे आपल्या मतदार संघात विकास कामे करता आली नाही. मात्र 2019 ला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने राज्यातील मोडकळीस आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा पुनर्जीवित केल्या असून आघाडी सरकारने 15 वा वित्त आयोग सुरू केल्याने जिल्हा परिषदेच्या एकूण विकास निधी पैकी दहा टक्के सेस हा पंचायत समितीला मिळत असल्याने शेवटच्या टप्यात अगदी कमी पैशात ही विकास कामे करायला मिळत असून विकास कामांच्या माध्यमातून गावांमधील अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागत आहे.
आमची नाळ या तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांसोबत विश्वासाने जोडली गेली आहे. त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तढा जाऊ देणार नाही. सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे हीच आमची प्राथमिकता असून पंचायत समितीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न अगदी कमी पैशात मार्गी लावले असून येणाऱ्या काळात देखील विकास कामांच्या बाबतीत कटिबध्द राहणार असल्याचे मत या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
या प्रसंगी सरपंच राजू शेळके, विलास उघडे, आदिवासी ठाकर समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश पथवे, सचिव बाळासाहेब मधे, बाळासाहेब मालुंजकर, अतुल लोहटे, शिवाजी सावंत, माधव वाकचौरे, उल्हास वाकचौरे, जिवन वाकचौरे, मुरली मेंगाळ, दत्तू मेंगाळ, रामनाथ उघडे, भरत उघडे, अक्षय उघडे, राजाराम पथवे, किरण पथवे, गोरख पथवे, वसंत पथवे, अजय पथवे, शांताराम मेंगाळ, भरत गिऱ्हे, दामू गिऱ्हे, नागेश आवारी, रेवननाथ मोरे, भरत उघडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या