महिलेला ग्रामसभेत मारहाण झालेली नाही असे सिद्ध केले तर त्या महिलेसह आम्ही सुद्धा राजीनामे देऊ- थोरात

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे ग्रामसभेत महापुरुषांच्या स्मारकावरून वाद निर्माण होऊन महिलेला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आरपीआयच्या वतीने सोमवार दिनांक ७ मार्च रोजी राहुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.

गेल्या दोन दिवसापूर्वी टाकळीमिया येथील ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे ही स्मारक उभारावे असा मुद्दा एका महिलेने मांडला असता तिला विरोध करून गावातील ५ लोकांनी मारहाण करून विनयभंग केला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान टाकळीमिया प्रकरणांचा राहुरी येथे झालेल्या मोर्चात सदर महिला ही समाजकंटक असून तिला तालुक्याबाहेर काढा अशी मागणी काही मोर्चाकऱ्यांनी केली. त्याचा तीव्र शब्दात थोरात यांनी निषेध व्यक्त केला. थोरात पुढे म्हणाले की सदर महिलेला ग्रामसभेत मारहाण झालेली नसेल असे सिद्ध केले तर त्या महिलेची पक्षातून हकालपट्टी केली जाईल. आम्ही सुद्धा आमच्या सर्व पदाचे राजीनामे देऊ असेही थोरात यांनी सांगितले.

उलट गावातील महेश घोरपडे या तरुनाने पीडित महिलेच्या पतीवर दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केला असून तो गुन्हा मागे घ्यावा. शिवाजी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की हा गुन्हा खरा आहे. या सर्व घटनेच्या निषेधार्थ सोमवार ७ मार्च रोजी आरपीआय आठवले गटाच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष थोरात यांनी सांगितले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे, उपतालुका अध्यक्ष सुनील चांदणे, प्रदीप भोसले, अतुल त्रिभुवन, फॅक्टरी शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे, संजय गिरी, माऊली भागवत, गणेश ओहळ, मयूर कदम, सुरेश लोखंडे, नवीन साळवे, नंदू सांगळे, सुभाष गायकवाड, भाऊसाहेब दिवे, महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई बोरुडे, महिला राहुरी तालुका उपाध्यक्ष छायाताई दुशिंग, प्रियांका सगळगिळे, उषा सगळगिळे, नीलम सगळगिळे, मंगल बारसे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या