जैविक इंधन आणि नैसर्गिक शेतीतून तालुका सुजलाम सुफलाम होणार- रंजित दातीर

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) - आजचे जीवन प्रदूषित झाले आहे, विविध रोगराई आणि रासायनिक खतामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे, त्यासाठी एमसीएल अंतर्गत श्रीरामपूरच्या जीतशार प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून तालुक्याला जैविक इंधन निर्मिती आणि नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून प्रदूषणमुक्तसह अर्थसंपन्न बनविणार आहे, असे मत जीतशार प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष रंजित दातीर यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील सोसायटी सभागृहात आयोजित शेतकरी मेळाव्यात रंजित दातीर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, प्रमुख वक्ते म्हणून माजी प्राचार्य टी.ई. शेळके, अर्थतज्ञ डॉ. बबनराव आदिक, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते इंद्रनाथ थोरात पाटील होते. संयोजक लक्ष्मणराव गाढे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले तर ग्रामोउद्दोजक शिशिर गाढे यांनी मान्यवर पाहुण्यांचा सत्कार केला. व्यासपीठावर माजी प्राचार्य डॉ. एकनाथ ढोणे, पत्रकार शरद थोरात, ग्रामपंचायत पदाधिकारी, सोसायटी पदाधिकारी उपस्थित होते. सभेसाठी ग्रामस्थ आणि संयोजन समिती कार्यकर्ते उपस्थित होते.

रंजीत दातीर यांनी आपली शेती, आपली संस्कृती आणि प्रकृती आज सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. गिन्नी गवतापासून आपण इंधन, गॅस निर्मिती करून शेतकऱ्याला अर्थसंपन्न करणार आहोत, गावातच रोजगार वाढणार आहे. आपल्या श्रमाचा योग्य मोबदला मिळणार आहे, असे सांगून त्यांनी एमसीएलचे शाम घोलप आणि त्यांची विचारधारा समजावून दिली. प्राचार्य शेळके यांनी सांगितले की, शेती ही प्रामाणिक आणि जिव्हाळ्यातून समृद्ध होते. आपली शेती आणि गाव विकसित झाले पाहिजे. डॉ. बबनराव आदिक म्हणाले, माझ्या खानापूर गावी 10 एकर शेतामध्ये जीतशार प्रोड्युसर कंपनी सुरु होत आहे. 110 रुपये भरून जे सभासद होतील त्यांना भविष्य उज्ज्वल आहे. आपले वातावरण दुषित झाले आहे, ते शुद्ध करायचे असेल तर शेती आणि गाव समर्थ अभियान चळवळीत सहभागी झाले पाहिजे. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आजची खेडी ही अनेक समस्यांनी ग्रासली आहे. आधुनिकतेच्या नावाखाली जीवन रोगमय आणि भयग्रस्त होत आहे. रंजित दातीर आणि डॉ.शाम शिवाजी घोलप यांनी समृद्ध भारताचे स्वप्न पाहिले आहे, त्यांनी आपले जीवन त्यासाठी समर्पित केले आहे. इंधन, गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तुनिर्मितीत आपण स्वावलंबी झालो तर अर्थसंपन्न होऊ, आरोग्यशील जीवन जगू असे म्हणून कवितेतून आरोग्य आणि संस्कृती कविता सादर केली.

इंद्रनाथ थोरात पाटील यांनी आपल्या भाषणात जीतशार प्रोड्युसर कंपनीच्या कार्याला बळ आणि सभासद होऊन सामर्थ्य दिले पाहिजे, त्यासाठी आम्ही सर्व सहकार्य करू आणि तालुक्याच्या भल्यासाठी सभासद होऊ असे आश्वासन देऊन, प्रत्येकाने त्वरित सभासद व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी मान्यवरांना पुस्तके देऊन गावात वाचन संस्कृती वाढावी अशी भावना व्यक्त केली. संयोजकांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या