शेतकर्यांनी गटशेतीच्या माध्यमातून मधमाशी पालन करावे - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

राहुरी विद्यापीठ : शास्त्रोक्त मधमाशीपालनाच्या माध्यमातून विविध पिकांमध्ये 30-40 टक्के उत्पादनात वाढ होणार आहे तसेच मधमाशीपालनातून आरोग्यदायी गुणधर्म असलेली अनेक उत्पादने आपल्याला मिळतात. त्यामुळे मधमाशीपालनाकडे एकात्मिक शेतीपध्दतीचा एक भाग म्हणुन पाहिले पाहिजे. ग्रामीण भागामध्ये तरुण शेतकर्यांनी एकत्र येऊन गटशेतीतुन मधमाशीपालनाचा व्यवसाय करावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विदयापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

राष्ट्रीय मधमाशी मंडळ, कृषि सहकार व शेतकरी कल्याण विभाग, कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली, भारत सरकार पुरस्कृत यपश्चिम महाराष्टामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने मधमाशीपालन, उच्च प्रतीचे मधमाशी बीज केंद्राचा विकास आणि मधुवनस्पती/फुलोरा यांची लागवड या प्रकल्पाअंतर्गत कृषि किटकशास्त्र विभाग, मफुकृवि, राहुरी यांचेद्वारे सात दिवसीय शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षण कार्यक्रम राहुरी, पुणे, धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक व सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रसंगी अधिष्ठाता (कृषि) डॉ. प्रमोद रसाळ, कृषि किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चिदानंद पाटील व प्राध्यापक डॉ. संतोष कुलकर्णी उपस्थित होते.

कुलगुरु डॉ. पाटील पुढे म्हणाले की, मधमाशीपालन शास्त्राबरोबर कला देखील आहे जिथे रोजगार निर्मितीबरोबर पिकांचे उत्पादन देखील वाढणार आहे व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मदत होणार आहे. मधमाशांकडुन शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्या कष्टाळु असतात तसेच वसाहतीतील निरनिराळी कामे वाटुन घेतात. एक किलो मध गोळा करण्यासाठी मधमाशांना एक लाख किलोमीटर प्रवास करावा लागतो. डॉ. प्रमोद रसाळ यांनी मधमाशीपालन हा शेतीपुरक व्यवसाय ठरत आहे तसेच मधमाशीपासुन मिळणार्या उत्पादनांचा आयुर्वेदीक शास्त्रामध्ये मोठा उपयोग होणार असल्याचे सुचित केले. या प्रशिक्षणात अनेक तज्ञांनी शास्त्रोक्त मधमाशीपालनाविषयी ऑनलाईन व ऑफलाईनद्वारे सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान ज्या त्या भागातील प्रशिक्षणार्थीनी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील बसवंत मधमाशी उद्यान, मध प्रक्रिया उद्योग तसेच महाबळेश्वर येथील मधमाशी पालन केंद्र व नंदुरबार जिल्ह्यातील कंजाला येथे भेट दिली. यावेळी प्रशिक्षणार्थी शेतकर्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक डॉ. चिदानंद पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी पाळंदे यांनी तर प्राध्यापक डॉ. संतोष कुलकर्णी यांनी आभार मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यातुन 25 शेतकरी सहभागी झाले होते. मधमाशी प्रकल्पातील सर्व जिल्हयातील समन्वयक व कृषि किटकशास्त्र विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या