राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अभ्यासक्रमात बदल केल्याने कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. अभ्यासक्रम पूर्ववत ठेवावा, या मागणीसाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आजपासून ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेच्या माध्यमातून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये आजपासून ठिय्या आंदोलन सुरू झाले. लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे विद्यार्थी संघटनेने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात येणार नसल्याचे संकेत स्थळावर २१ जून २०२१ रोजी स्पष्ट सांगितले होते. प्रत्यक्षात फेब्रुवारी महिन्यात असा बदल करण्यात आला असून कृषीसाठी 280 गुणांऐवजी फक्त सोळा गुणांचाच नवीन अभ्यासक्रमाचा त्यात समावेश असणार आहे.
कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे तीव्र असंतोष असून याबाबत अनेकांनी संबंधितांना सातत्याने निवेदने पाठवली. परंतु त्यांची काहीही दखल घेतली गेली नाही म्हणून संघटनेने राज्य स्तरावर आंदोलन सुरू केले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यांनी आज या आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी संघटनांच्या मागणीनुसार राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची आँनलाइन बैठकीत या मागण्यांबाबत विचार केला असून त्याबाबतचा अहवाल ते सर्व संबंधितांना राज्य शासन, लोकसेवा आयोग व राज्यपालांकडे पाठवण्यात येणार असल्याचे विद्यार्थी संघटनेने सांगितले. मात्र या तोंडी आश्वासनावर आंदोलन मागे घेण्यास विद्यार्थ्यांनी नकार दिला. लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे विद्यार्थी संघटनांनी स्पष्ट केले.
या आंदोलन चर्चेच्या वेळी संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव प्रमोद लहाळे, प्रमोद रसाळ, सहयोगी अधिष्ठाता दिलीप पवार हे कुलगुरू समवेत होते. आंदोलकांनी घोषणाबाजी करुन परीसर दुमदुमून टाकला होता. यावेळी कोण म्हणतो देणार नाही, वुई वाँन्ट जस्टीस अशा घोषणा दिल्या गेल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या