दुचाकी-ट्रकच्या अपघातात तरुण जागीच ठार


◾पैठण औरंगाबाद रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच...

पैठण : पैठण-औरंगाबाद रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच असून गेल्या आठवड्यात अपघातात एक बळी गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा या रस्त्यावरील डिएमआयसी जवळ मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मालवाहू ट्रक व दुचाकीची समोरांसमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात बावीस वर्षीय तरुणास आपले प्राण गमवावे लागले. सचिन प्रल्हाद शिंदे (रा.बिडकीन ता.पैठण) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कर्नाटक राज्यातील मालवाहू ट्रक (के.ए. ७६९८) भरधाव वेगाने पैठण दिशेने जात असताना कौडगाव नजीक असलेल्या डिएमआयसी नजीक विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात बिडकीन येथील दुचाकीस्वार सचिन प्रल्हाद शिंदे (२२) हा जागीच ठार झाला. या ट्रकचा ड्रायव्हर साईडचा लाईट बंद असल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे बोलले जात आहे. घटनेनंतर अंधाराचा फायदा उठवत ट्रक ड्रायव्हर घटना स्थळावरून पसार झाला होता. मात्र बिडकीन पोलीसांनी पैठण एमआयडीसी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. सतर्क झालेल्या एमआयडीसी पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून त्या ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले.  

याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास बिडकीन पोलिस करत आहेत. या रस्त्यावर छोट्या मोठ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या दृष्टीने हा रस्ता खुपचं अरुंद असल्यामुळे या रस्त्यावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाणही वाढले असून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. याला आळा घालण्यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण करणे गरजेचे आहे. तेव्हाच अशा घटनांना आळा बसेल. प्रशासनाने या गोष्टीचे गांभीर्य ओळखून लवकर चौपदरीकरणाचे काम हाती घ्यावे अशी मागणी नागरीक करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या