निर्मितीत सर्जनशीलता असेल तर त्याचे कुतूहल वाटते - रज्जाक शेख

अहमदनगर/ जावेद शेख : बेलापूर कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर ता. श्रीरामपूर येथील सर्व विद्यार्थ्यांसाठी दि.७ मार्च ते १४ मार्च २०२२ या कालावधीत 'सॉफ्ट स्किल प्रोग्राम अंतर्गत' 'ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी " निर्मितीत नाविन्यता असेल तर त्याचे कुतूहल वाटते" असे उदगार दिनांक १२ मार्च २२ रोजी सहावे पुष्प गुंफताना साहित्यिक तथा जीवन गौरव शैक्षणिक मासिकाचे सहसंपादक रज्जाकभाई शेख यांनी काढले.

सर्जनशीलता या विषयाचे मराठी साहित्यात असणारे महत्व विषद करताना ते श्रोत्यांना संबोधित करत होते. विद्यार्थ्यांना विविध विषयांवर प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणारे व्यापक विचार या कालावधीत ऐकावयास मिळाले. रज्जाक शेख यांनी कवितेचे वेगवेगळे काव्यप्रकार व त्यांतून नवकाव्यनिर्मिती यांवर लक्ष केंद्रित केले. सर्जनशीलता साहित्यात कशी आणता येईल ? या प्रश्नाच्या अनुषंगाने शेतकरी कष्टकरी जीवनातील समस्येला स्पर्श करणारी "मायेची भाकरी " ही रचना गाऊन सादर केली. दुष्काळाच्या झळा व त्यातून निघालेल्या यातनांचे स्पष्टीकरण आपल्या काव्यातून समोर ठेवले. तसेच त्यांच्या "'प्रेमावरची हलकीफुलकी गझल" सादरीकरणाने श्रोत्यांना खिळून ठेवले.

आपल्या व्याख्यानात अनेक संदर्भ आणि दाखले देताना शिक्षणावर आधारित "माय मला शाळेला धाडायची" चवदार तळ्याच्या क्रांतीची 'भीमा तुझ्या येण्यानं " निसर्गाच्या नवचैतन्य निर्मितीची 'आल्या श्रावणसरी ',यांसारख्या एकाहून एक मंत्रमुग्ध रचना सादर करून विद्यार्थी श्रोत्यांना मार्गदर्शन केले. असेच नवनवीन उपक्रम महाविद्यालयात राबवावे यासाठी आम्ही शब्दगंध साहित्य परिषदेमार्फत नेहमीच सहकार्य करू असे शेख म्हणाले.

यावेळी गुगल मिटवर बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्राचार्या, मराठी विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात व्याख्याते शेख सरांचा परिचय प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बाचकर यांनी तर आभार प्रा.निजाम शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या