अहमदनगर/ जावेद शेख : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संस्थापक अध्यक्षा स्व.शालिनीताई लाला पंडित व मार्गदर्शक तथा आधारस्तंभ स्व. लाला रतन पंडित यांनी स्थापन केलेल्या बहुजन महिला ग्रामिण विकास संघ या संस्थेचे उद्घाटन सोहळा स्नेहसदन चर्च राहुरी या ठिकाणी राहुरी नगरपरिषदेचे नगरसेवक सुर्यकांत भुजाडी व समन्वयक सुनंदाताई दहातोंडे यांचे हस्ते व स्नेह सदन चर्चचे फादर अनिल चक्रनारायण यांच्या अध्यक्षतेखाली व फादर मायकल राजा, रतन पाळंदे, रोहिणी हिवाळे व जीजस कॉल एस्टर ग्रुप राहुरी या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
प्रास्ताविक करतांना संस्थेच्या उपाध्यक्ष ॲड.मनीषा लाला पंडित म्हणाल्या की, बहुजन महिला ग्रामीण विकास संघ हा बहुजन महिलांच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य गोरगरीब महिलांच्या विकासासाठी सदैव कार्यरत आहे. सदरच्या कार्यामध्ये आमचे आईवडील संघाचे अध्यक्ष संस्थापक व मार्गदर्शक स्व.शालिनीताई लाला पंडित व स्व.लाला रतन पंडित यांनी अतिशय मोलाचे कार्य केलेले असून संस्थेचा हेतू हा सर्वसामान्य महिलावर्ग यांचा सक्षमीकरणाचा असून महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार यांच्या विरोधात लढा देणारा असा असून महिलांच्या विकासासाठी कार्यरत असणार आहे. आई-वडील यांनी समाजातील महिलांच्या हक्कासाठी दिलेला लढा व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध केलेल्या कार्याचा उजळा दिला. यापुढेही मी स्वतः व संस्थेचे अध्यक्ष विनोद कुमार पंडित संघ सदस्य शोभा विनोद जगताप, सचिव शीतल विनोद कुमार पंडित सर्व पदाधिकारी यापुढेही कार्यरत असणार आहोत असे ॲड.पंडीत यांनी सांगितले.
कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक सुर्यकांत भुजाडी म्हणाले की, आई स्व.शालिनीताई व वडील स्व.लाला पंडीत साहेब यांचा सामाजिक कार्याचा वसा त्यांची मुले विनोदकुमार व ॲड मनिषा पंडीत हे उत्तम रित्या पार पाडत आहेत. आमची मदत लागली तर नक्की सांगा आम्ही समाज कार्यात मदत करु असे सुर्यकांत भुजाडी यांनी सांगितले. कार्यक्रमास उपस्थित माता भगिनींना महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. फादर अनिल चक्रनारायण यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये समाजामध्ये महिलांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना मोलाचे स्थान देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तिच्या विकासाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे असे सांगितले. तसेच बहुजन महिला ग्रामीण विकास संघ हा समाजातील महिलांच्या विकासासाठी कार्यरत असून त्या कार्यामध्ये पाहिजे तेवढी मदत करायला ते तयार आहेत असे प्रतिपादन केले.
तसेच सुनंदाताई दहातोंडे यांनी बहुजन महिला ग्रामीण विकास संघाचे अध्यक्ष संस्थापक व मार्गदर्शक स्व.शालिनीताई पंडीत व स्व.लाला रतन पंडित यांनी बहुजन महिलांच्या विकासासाठी हाती घेतलेल्या विविध सामाजिक राजकीय आणि धार्मिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. रतन पाळंदे यांनी सांगितले की, सामाजिक क्षेत्रामध्ये नाव कमावलेल्या आपल्या परम पूज्य मदर तेरेसा यांनी केलेल्या महान कार्याबद्दल उजाळा दिला व मी देखील बहुजन महिला ग्रामीण विकास संघाच्या कार्यासाठी नेहमी उभे राहणार आहे असे सांगितले. समन्वयक सुनंदाताई दहातोंडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना बहुजन महिला ग्रामिण विकास संघाच्या वतीने गौरविण्यात आले. जया सोळसे या दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या भगिनीने सुरेख आवाजात उत्कृष्ट गायन करुन उपस्थितांचे मने जिंकली.
या कार्यक्रमासाठी रोहिणी कापसे, सुनंदा ढवळे, जया सोळसे, कांता गुप्ता, स्वाती गुप्ता, वच्छला पातोरे, पल्लवी साळवे, सविता साळवे, रेखा हिवाळे, संगीता हिवाळे, अनुष्का हिवाळे, रोहिणी देठे, प्रमिला साळवे, बाळूबाई पवार, खरात बाई, जाधव बाई, राजू साळवे, सुभाष सगळगिळे, विकी साळवे, बाबा जाधव, विकास साळवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सगळगिळे यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष विनोदकुमार पंडित यांनी मानले.
0 टिप्पण्या