तृतीयपंथियांनी ऑनलाईन नोंदणी करुन ओळखपत्र प्राप्तकरून घेणेबाबत समाजकल्‍याण विभागाचे आवाहन

अहमदनगर / जावेद शेख - शासनामार्फत तृतीयपंथांसाठी विविध योजना राबविण्‍याकरिता व तृतीयपंथीयांना प्राथमिक हक्‍क प्राप्‍त करून देण्‍यासाठी जिल्‍ह्यातील सर्व तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र/ओळखपत्र जारी करण्‍याच्‍या अनुषंगाने केंद्र शासनाने अर्ज करण्‍यासाठी ऑनलाईन प्‍लॅटफॉर्म (transgender.dosje.gov.in) विकसित केला आहे. या लिंकद्वारे तृतीयपंथी ते कुठे असतील तेथुन अर्ज करु शकतात. ट्रान्‍सजेन्‍डर धोरणानुसार एखाद्याची ओळख दर्शविण्‍यासाठी आणि पासपोर्ट, आधार व इतर कागदपत्रांमध्‍ये बदल करण्‍यासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग केला जाऊ शकतो. त्‍यामुळे हे ओळखपत्र/प्रमाणपत्र तृतीयपंथीयांसाठी महत्‍वाचे आहे.

ओळखपत्र व प्रमाणपत्र हे तृतीयपंथीयांनी प्राप्‍त करुन घेतल्‍यानंतर शासनास त्‍या आधारे विविध योजना राबविणे शक्‍य होईल. त्‍याअनुषंगाने अहमदनगर जिल्‍ह्यातील तृतीयपंथीयांना National Portal वर ऑनलाईन नोंदणी करून ओळखपत्र प्राप्‍त करून घेणेबाबत काही अडचणी निर्माण झाल्‍यास सहायक आयुक्‍त कार्यालय, अहमदनगर येथे संपर्क साधावा. असे राधाकिसन देवढे, सहायक आयुक्‍त, समाजकल्‍याण, अहमदनगर यांनी जिल्‍ह्यातील सर्व तृतीयपंथीय व तृतीयपंथीयांसाठी कार्य करणा-या सामाजिक संस्‍था यांना आवाहन केले आहे.

ऑनलाईन नोंदणी करण्‍यासाठी स्‍वयंघोषणापत्र / प्रतिज्ञानपत्र, आधार कार्ड / मतदान कार्ड आणि दोन कलर फोटो असणे आवश्‍यक आहे. असेही आवाहन सदस्‍य सचिव, जिल्‍हा तक्रार निवारण समिती (तृतीयपंथी) तथा सहायक आयुक्‍त, समाजकल्‍याण, अहमदनगर यानी प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या