वाचन संस्कृती प्रतिष्ठान म्हणजे पुस्तकवाचनाची एक प्रेरणाज्योत - प्रा. कैलास पवार

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे चालवलेली पुस्तकनिर्मिती, वाचन, चिंतन, प्रकाशन आणि ग्रन्थभेट ही एक प्रेरणाज्योत असल्याचे मत भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य सेवाभावी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. कैलास पवार यांनी व्यक्त केले.

येथील वाचन संस्कृती ग्रन्थदालनात पुस्तकचर्चा आणि ग्रन्थवाचन वाढविणे याविषयी उपक्रम झाला त्यावेळी प्रा. कैलास पवार बोलत होते. याप्रसंगी मुठेवाडगाव येथील माजी पोलीस पाटील वसंतराव मुठे, पत्रकार तथा फोटोग्राफर बाबासाहेब चेडे, आरोग्यमित्र भीमराज बागुल उपस्थित होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी भूमी फाऊंडेशन वाचनालयासाठी अनेक पुस्तके भेट दिली. प्राचार्य सौ. मंगलताई पाटील, प्राचार्य टी. ई. शेळके, प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, डॉ. रामकृष्ण जगताप, डॉ. शिवाजी काळे यांनीही भूमी फाऊंडेशनला आतापर्यन्त शेकडो पुस्तके मोफत दिल्याबद्दल प्रा. कैलास पवार यांनी समाधान व्यक्त केले. ते पुढे म्हणाले,आज जग मोबाईलमय झाले आहे, तरुण पिढी पुस्तक वाचन संस्कृतीपासून दुरावत आहे, 'आज वाचल तर उद्या प्रगतीशील जगाल' हे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे, डॉ. उपाध्ये यांनी बोरावके कॉलेजमध्ये असतानाच आमच्यासारख्या ग्रामीण विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या जवळ नेले, वाचन, लेखन, संशोधन आणि सेवाभाव याबद्दल जिव्हाळा निर्माण केला, आम्ही अधिक वाचते झालो आता सेवानिवृत्तीनंतरही डॉ. उपाध्ये यांचे हे कार्य सुरु आहे, त्यांनी दिलेली शेकडो पुस्तके भूमी फाऊंडेशनतर्फे अनेक घरात पोचली आहेत.

भूमी संस्थेने वाचन चळवळलाही महत्व दिल्याचे सांगितले. जेष्ठ नागरिक मंडळाचे मार्गदर्शक वसंतराव मुठे यांनी भूमी फाऊंडेशन आणि वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. भीमराज बागुल यांनी वाचन चळवळ गावागावात वाढली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून हरेगाव येथे ही चळवळ वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. बाबासाहेब चेडे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या