कोल्हापूर : " मराठ्यांसोबत बहुजनांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांचे विचार घेऊन आपल्यासोबत ठामपणे उभे आहोत, हा लढा यशस्वी करूया. " असा निर्धार खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज भवानी मंडपात व्यक्त केला. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या राज्य सरकारकडून मंजूर करून आणल्याबद्दल करवीरवासीयांतर्फे संभाजीराजे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हत्तीवरून साखर वाटत शाही मिरवणुकीने त्यांचे स्वागत झाले.
मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्या मोर्चाव्दारे करण्यात आल्या होत्या. अनेक मागण्या प्रलंबित होत्या, मागण्या मान्य कराव्यात, या मागणीसाठी संभाजीराजे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण केले. तीन दिवसांनंतर राज्य शासनाने मागण्या मान्य केल्या. त्यानंतर संभाजीराजे यांचे कोल्हापुरात प्रथमच आगमन झाले.
संभाजीराजे कोल्हापुरात येताच त्यांनी रूईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. त्यानंतर ताराराणी पुतळा, शाहू महाराज समाधीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर त्यांचे शिवाजी चौकात आगमन होताच आतषबाजी करण्यात आली. हत्ती, घोडेस्वार, ढोलताशा, झांजपथक, वारकरी वाद्य वृंद, धनगरी ढोल अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने त्यांना भवानी मंडपात नेले. येथे संभाजीराजे यांनी करवीरवासीयांनी केलेल्या जंगी स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुंबईतील आंदोलनाचा तपशील व घटनाक्रम सांगितला.
कोल्हापूरसाठीही वेळ देणारआंदोलनाला मिळालेले यश हे सर्वांचे यश आहे. यापुढेही छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांचे विचार घेऊन सगळे एकत्रपणे आरक्षणाचा लढा लढणार आहोत. त्यासाठी राज्यभर फिरत आहे. या पुढे मुंबईत दिल्लीत गेलो, तरी कोल्हापूरवासीयांसाठी वेळ काढून येथील विकासासाठी यापुढील काळात वेळ देणार आहे, असे आश्वासन संभाजीराजे छत्रपती यांनी दिले.
यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, " मराठा समाजाच्या मागण्या शासनाने प्रलंबित मान्य केल्या. त्याची अंमलबजावणी होते, की नाही हे लोकांनी पाहिले पाहिजे. मंजूर मागण्यांचा लाभ मराठा समाजाने घेतला पाहिजे, आरक्षणाचा लढा हा चोहोबाजूने सुरू ठेवला आहे, राजर्षी शाहू महाराजांच्या घराण्याविषयी आदर पाहिजे. यापुढे दिल्लीचा तख्तावर धडक मारावी. यावेळी संयोगिताराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या