येत्या बुधवारी श्रीरामपूरात "एक सुर एक ताल" कार्यक्रम; विद्यार्थ्यांनाही संगीत प्रशिक्षण

अहमदनगर/ जावेद शेख : भारत अमृत महोत्सवानिमित्त युवक बिरादरी भारत जिल्हा शाखा श्रीरामपूर यांचेवतीने बुधवार दिनांक २३ मार्च रोजी दुपारी १ ते ५ या कालावधीत श्रीरामपूर येथील खा.गोविंदराव आदिक सभागृहामध्ये "एक सुर एक ताल" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने जय्यत तयारी सुरू असून नगर जिल्ह्यामध्ये प्रथमच हा कार्यक्रम होत असल्याने रसिकांमध्ये खूप उस्तुकता वाढत आहे.

सदरील कार्यक्रम दोन टप्प्यात होणार असून प्रथम शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संगीत व गायनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर युवक बिरादरी टीम नृत्य व समूह गायन सादर करणार आहेत. विद्यार्थी प्रशिक्षणात स्वागतगीत, एशास्तवण, प्रार्थना, आभार व समारोप गीत, देशभक्तीपर व समूह गायन आदी गायन प्रकार शिकवले जाणार आहेत. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम सादर होत आहे.

"एक सुर एक ताल" या कार्यक्रमाने दूरदर्शनवर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. सर्व कलाकार अनुभवी व प्रसिद्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच सांस्कृतिक चळवळ विकसित व्हावी या उदात्त हेतूने सादर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. विद्यार्थी प्रशिक्षणासाठी शहरातील कॉलेज, शाळा व इतर तालुक्यातील निवडक विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश विनामूल्य आहे. प्रत्येक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

कार्यक्रम यशस्वी पार पाडणेसाठी जिल्हाध्यक्ष के.के. आव्हाड, समन्वयक सुनील साळवे, कार्याध्यक्ष शैलेंद्र भणगे, सेक्रेटरी संतोष जाधव, जनसंपर्क अधिकारी सागर नीजावळे, संस्थापक संजय जोशी, भरत कुंकुलोल, मार्गदर्शक प्रवीण साळवे, सल्लागार पोपटराव शेळके, सागर गिरनारे, प्रा.सुप्रिया साळवे आदींनी परिश्रम घेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या