आहार-विहार व योगाभ्यास स्त्रियांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा - योग मार्गदर्शिका सौ. वैशाली अहिरे

राहुरी विद्यापीठ : जागतिक महिला दिनाचा यावर्षीचा विषय स्त्री-पुरुष समानता असून महाविद्यालयातील शिक्षण घेत असणार्या विद्यार्थिनींनी अतिजागरण, अतिकष्ट टाळुन योग्य विश्रांती घेतल्यास स्त्रियांच्या आरोग्याच्या बर्याच समस्या कमी करता येतील. दैनंदिन आहारामध्ये सात्विक आहाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तामस आहार शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य आहे असे प्रतिपादन योग मार्गदर्शिका सौ. वैशाली अहिरे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमा निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून त्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे उपस्थित होते. सौ. अहिरे पुढे म्हणाल्या की आहार घेत असताना भुकेच्या 50% घन पदार्थ, 25% द्रवपदार्थ घ्यावेत व भुकेच्या 25% पोट रिकामे असणे गरजेचे आहे, ज्यामुळे पचन व्यवस्थित होऊन अपचनाचे अनर्थ टाळता येतात. याच बरोबर जेवणाच्या आदर्श वेळा म्हणजे सकाळचे जेवण सकाळी 10 ते 1.00 वाजेपर्यंत घ्यावे व रात्री जेवणाची वेळ 6.00 ते 8.00 असावी. झोपण्यापूर्वी कमीत कमी 3.00 तास अगोदर आहार घेणे गरजेचे आहे. दुपारी जेवणानंतर ताक व रात्री झोपण्यापूर्वी दूध घेतल्यास आरोग्याच्या दृष्टिने अत्यंत फायदेशीर आहे.

डॉ. मिलिंद अहिरे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी योग्य आहार, दररोज व्यायाम व योगाभ्यास करावा जेणेकरून आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. कार्यक्रमाची सुरुवात व शेवट तीन वेळा ओंकार करुन करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रुतिका व्यवहारे, प्रज्ञा घुले, मयुरी फुके, ज्योती माने व अक्षता अन्नदाते यांनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात नव्यानेच स्थापन झालेल्या विद्यार्थी परिषदेची सभापती कुमारी मयुरी गुंजाळ हिचा सत्कार विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अनारसे यांच्या हस्ते तर राष्ट्रीय शेती चित्रपट महोत्सव 2022 मॅनेज हैदराबादसाठी निवड झालेल्या शेती या फिल्मसाठी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षाची विद्यार्थिनी कुमारी अक्षता अन्नदाते हिचा पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अहिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. प्रेरणा भोसले यांनी केले तर उपस्थितांचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. कीर्ती भांगरे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. चारुदत्त चौधरी, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. मनोज गुड व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या