महिला दिन विशेष: पतीच्या निधनानंतर यशस्वी केला वीटभट्टीचा व्यवसाय; खचून न जाता धैर्याने ठेवले व्यवसायात पाऊल: ४०- ४५ जणांना दिला रोजगार

वीट बनवित असताना पहाणी करताना अर्चनाताई म्हसे...

राहुरी : शहाजीराजे भोसले यांच्या मृत्यूपश्चात राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठीशी उभे राहुन स्वराज्य निर्मिती चे स्वप्न साकारले. त्याचप्रमाणे राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील जिजाऊंची लेक श्रीमती अर्चनाताई संजय म्हसे यांनी कोरोना काळात आपल्या पतीच्या निधनानंतर खचून न जाता त्यांनी उभारलेला वीटभट्टीचा व्यवसाय यशस्वीपणे चालू ठेऊन आपल्या घराची देखभाल करत अनेकांना रोजगार दिला आहे.

अर्चनाताई यांनी सन २००५ साली राज्यशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली. त्याच वर्षी त्यांचा विवाह संजय रामदास म्हसे यांच्याशी झाला. त्यांना मुलगा आदित्य व मुलगी आराध्या हे दोन अपत्ये असून आदित्य १० वी व आराध्या ४ थी या वर्गात शिक्षण घेत आहेत. पहायला गेले तर राहुरी तालुका हा औद्योगिक दृष्ट्या मागासलेला भाग. त्यात येथील नागरिकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय. त्यात ग्रामीण भागाबरोबरच रहदारी नसलेले शिलेगाव गाव. अशा गावात स्व. संजय म्हसे यांनी वीटभट्टीचा व्यवसाय सुरू करुन या व्यवसायात यशस्वी भरारी घेतली. परंतु कोरोना महामारीच्या काळात त्यांचा मृत्यू झाला. या दुःखातून श्रीमती अर्चनाताई यांनी सावरत आपल्या पतीचा व्यवसाय यशस्वीपणे सुरू ठेवला. या व्यवसायातून त्या आपला घर खर्च, मुलामुलीचे शिक्षण व इतर कार्यक्रम यशस्वी पार पाडत आहेत.

या व्यवसायातून त्यांनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करून ४० ते ४५ कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पतीच्या निधनानंतर त्यांनी वीटभट्टीचा व्यवसाय सुरू नसता केला तर आज या कामगारांवर बेरोजगाराची टांगती तलवार होती. परंतु त्यांच्या या निर्णयामुळे कामगारांना आधार मिळाला असुन या व्यवसायातून भरारी घेऊन एका नव उद्योजकाचा उदय झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या