राहुरी / प्रतिनिधी - तालुक्यातील चिंचोली येथील ग्रामदैवत श्री. वीरभद्र महाराज यांच्या यात्रोत्सवाला आज मंगळवारपासून प्रारंभ होत असून या निमित्ताने धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक एकतेचा मेळा गावातून होत आहे. तीन दिवस चालणार्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात.
गत दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे निर्बंध आल्याने गावागावातील जत्रा यात्रांवरही बंदी आली होती. त्यामुळे अबालवृध्दांच्या आनंद सोहळ्याला मर्यादा आलेल्या होत्या. मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग काहीसा मंदावला असल्याने शासनाने काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहे त्यामुळे यात्रांना अतिशय आनंदोत्सवात प्रारंभ झाला आहे. चिंचोली गावाचे ग्राम दैवत श्री वीरभद्र महाराज यांचा यात्रोत्सव सालाबाद प्रमाणे रंगपंचमीच्या मुहूर्तावर साजरा केला जातो.
कोरोनाने महामारी बरोबरच निसर्गाचे बदलते रूप यामुळे ग्रामिण जनता आर्थिक अडचणीत सापडली आहे. ग्रामिण भागात आर्थिक व्यवस्थेचा प्रमुख कणा हा शेती असल्याने यंदा वातावरणीय बदलामुळे म्हणावे तसे उत्पन्न शेतीतून मिळाले नाही. तुऱ्याचे उस अजूनही शेतात तोडीविना उभे आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन-तीन वर्षापासून थंडावलेला यात्रोत्सव ग्रामस्थ साजरा करीत आहे. रंगपंचमीच्या दिवशी पहाटे प्रामुख्याने गोदावरीच्या पवित्र पाण्याने वीरभद्र महाराजांना जलाभिषेक करून यात्रोत्सवाला प्रारंभ होत असतो . या दिवशी सायंकाळी मानाची काठीची मिरवणूक काढली जाते यात गावकऱ्यांबरोबर इतर गावातील भक्त मंडळींचा सहभाग वाखाणण्याजोगा असतो. या मनाच्या काठीच्या मिरवणुकीसाठी डफाच्या ताणबद्ध वाद्यावर लहान-थोर मंडळी फेर धरून ठेका धरतात. ही मिरवणूक पाहणी म्हणजे एक पर्वणीस असते. परंपरागत डफाचा ठेका वर्षातून एकदाच वाजत असल्याने भाविक भक्ताच्या डोळ्याची पारणे फेडण्याचा हा आनंद घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक आवर्जून हजेरी लावत असतात.
मिरवणुक विसर्जनानंतर सवाल-जवाब कार्यक्रमही मंत्र मुग्ध करणारा असतो. या देवस्थानाला भाविक विविध नवस बोलत असतात. तो पूर्ण झाल्यानंतर काठी मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध असा दंडवताचा कार्यक्रम असतो. दोन ते तीन कि.मी. हून ऐन उन्हात महिला व पुरुष भाविक दंडवत घेताना पहावयास मिळतात. त्यातून मनोकामना पूर्ण होत असल्याची भाविकांमधून सांगितले जाते. या यात्रेच्या निमित्ताने गावात एक आनंद व उत्साहाचे वातावरण पाहून जणू आनंद पर्व साजरा केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळते. खेळणी महिलांसाठीच्या वस्तूचे दुकाने बरोबरच मिठाई व गृहपायोगी वस्तूंच्या दुकानांची रेलचेल या यात्रोत्सवाच्या निमित्ताने पहावयास मिळते.
गावात प्रामुख्याने मांसाहारी जेवणाची रेलचेल यात्रेचे मुख्य आकर्षण असल्याने पै पाहुण्यांची मिजास ठेवण्यासाठी नगर - मनमाड महामार्गावरील हॉटेल व धाबे फुलून गेल्याचे चित्र या निमित्ताने सर्वत्र पहावयास मिळते. एकूणच अतिशय भक्ती भावाने यात्रोत्सव साजरा केला जात असल्याने ग्रामीण भागातील हा मुख्य उत्सव समजला जातो.
0 टिप्पण्या