राहुरी / बाळकृष्ण भोसले - मराठी भाषेला प्राचीन परंपरा असून अनेक बोलीभाषा, म्हणी, अलंकार यांनी सर्वांगसुंदर बनलेली मराठी ही भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक, नाटककार, कवी कुसूमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. अनेक सरस कथा, कांदबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता यांचे लेखन करून त्यांनी मराठी भाषेची सेवा केली. त्यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो असे प्रतिपादन संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मफुकृवि राहुरी येथील प्रा.डॉ. महाविरसिंग चौहान यांनी केले.
कोल्हार येथील लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी वाड्मय मंडळाने आयोजित केलेल्या मराठी राजभाषा दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयाच्या कँम्पस डायरेक्टर डॉ. जयश्री सिनगर यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे होते.
आपल्या प्रमख भाषणात पुढे बोलताना डॉ. चौहान म्हणाले मराठी भाषेतील साहित्य सम्रुध्द असल्याने येणाऱ्या पिढीला मराठी साहित्याची ओळख करुन दिली पाहिजे. संतांनी लेखकांनी, इतिहासकारांनी आपल्या भाषेत दिलेलं ज्ञान मिळविणे अत्यंत गरजेचे आहे तेंव्हाच आपल्या भाषेबद्दल आणि आपल्या मातीबद्दल अभिमान वाढेल आपणा सर्वांनी मराठीचा अभिमान बाळगावा मराठी भाषा सम्रुध्द करण्यासाठी तसेच जोपासण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले.
प्रसंगी प्रा. अनिल गिते यांनी ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे अम्रुतालाही पैजेत जिंकणारी आपली मायबोली संत एकनाथ महाराजांच्या भारुडांनी आणि अनेक संतांच्या किर्तन, ओव्यांनी तसेच भजनांनी सजली आहे हे सोदाहरण स्पष्ट केले. प्राध्यापकांच्या वतीने परमेश्वर विखे तर विद्यार्थीनींच्या वतीने कु. वैष्णवी डोखे व भाग्यश्री खर्डे यांनी मनोगत व्यक्त केले जयश्री सिनगर यांनी उपस्थितांना मराठी भाषेची थोरवी वर्णन केली. प्राचार्य सोपान शिंगोटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख राजेंद्र वडमारे यांनी केले. सुत्रसंचलन कु. आरती नवगिरे हिने तर आभार प्रदर्शन प्रा. संगिता धिमते यांनी केले. प्रसंगी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
0 टिप्पण्या