राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात व पश्चिम महाराष्ट्रातील 90 % भात लागवड करणारे शेतकरी लोणावळा संशोधन केंद्राने दिलेल्या शिफारशी वापरून रोगापासून होणारे 20 ते 30 % नुकसान दरवर्षी टाळतात, यामुळे शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्नात भरीव वाढ झाल्याची दिसून येते.
लोणावळा संशोधन केंद्राच्या उल्लेखनीय संशोधन कार्यामुळे भात उत्पादक शेतकर्यांची उत्पादकता वाढण्यास मदत झाली असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी.पाटील यांनी आज लोणावळा येथील कृषि संशोधन केंद्रास भेट दिली यावेळी मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी त्यांनी संशोधन केंद्रात होत असलेल्या विविध संशोधन कार्याचा आढावा घेतला. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या लोणावळा येथील या संशोधन केंद्राने भात पिकावरील विविध रोगांच्या नियंत्रणासाठी अनेक शिफारशी दिलेल्या आहेत तसेच रोगप्रतिबंधक वाण विकसित करण्यासाठी रोगप्रतिबंधक डोनर वाणाची भात पैदासकार यांनी शिफारस दिलेली आहे.
यावेळी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी व भात रोग शास्त्रज्ञ डॉ. किरण रघुवंशी यांनी विद्यापीठातील व अखिल भारतीय समन्वित प्रकल्पातील विविध संशोधन प्रयोग, हिरवळीचे खताचा व अझोलाच्या वापराचे महत्व, बीजोत्पादन व विस्तार कार्यक्रम या बाबींचे सादरीकरण केले. यावेळी लोणावळा केंद्रावरील इतर कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या