श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : अनेक दिवसांपासून शिर्डी पुणे मार्गे मुंबई जाणारी फास्ट प्रवासी रेल्वे बंद करण्यात आली ती आता कोरोना निर्बंध सर्वत्र शिथिल करण्यात आल्याने नोकरी, व्यापारी आदी कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करून पूर्ववत बेलापूरला सायंकाळी ५ वाजता येणारी रोजची एक्स्प्रेस सुरु करावी अशी मागणी श्रीरामपूर तालुका कॉंग्रेस चिटणीस इसाकभाई पठाण शिरसगाव यांनी केली आहे.
या गाडीने अनेक व्यापारी सकाळी पोहोचून दिवसभर कामे आटोपून रात्री ११ वाजता मुंबईहून निघून बेलापूर स्थानकात सकाळी ९.१५ ला येत होते. आता सध्या साईनगर दादर एक्स्प्रेस क्रमांक ११०४२ आठवड्यातून श्रीरामपूर मार्गे बुधवार, गुरुवार, शुक्रवार व रविवारी शिर्डीहून रात्री ८.१० वाजता निघून दादरला सकाळी ६.३५ ला पोहोचते. श्रीरामपूरला रात्री ८.१० वा. येते. चारच दिवस रेल्वे असल्याने व सध्या एस टी बसेस बंद असल्याने खाजगी बसेसने प्रवास करावा लागत असतो. त्यासाठी सुद्धा गाडीत जागा उपलब्ध नसल्याने तातडीचा प्रवास रद्द करावा लागतो अशा समस्या होतात. त्यासाठी पूर्वीची शिर्डी साईनगर येथून दुपारी ४.२० वाजता निघणारी व पुणे मार्गे रोजची गाडी पूर्ववत सुरु करावी.
शिर्डी दर्शन, श्रीरामपूर नगर येथे असणारी मोठी बाजारपेठ यामुळे रेल्वेला आर्थिक उत्पन्न जादा मिळणार असल्याने ती गाडी सुरु करणे गरजेचे आहे. असेही इसाकभाई पठाण यांनी सांगितले. बेलापूर येथे दुहेरी रेल्वेमार्ग झाला आहे. पूर्ण काम झाल्यावर वेळेची बचत होणार आहे.
0 टिप्पण्या