राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत चालविल्या जाणार्या बेकरी युनिटमध्ये तयार होणार्या नानकटाई कुकीज/बिस्किटांना भारतीय बौद्धिक मालमत्ता/ संपदा अधिकार प्रमाणपत्र अर्थात पेटंट अधिनियम 1970 च्या कायद्यानुसार 20 वर्षांसाठी प्रदान करण्यात आले. यामुळे विद्यापीठाने तयार केलेल्या नानकटाई कुकीज/बिस्किटांचा दर्जा, गुणवत्ता व त्याचे सार्वभौमत्व हक्क विद्यापीठास प्राप्त झालेली आहेत. बेकरी युनिटच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी विभाग प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन केले आहे.
विद्यापीठाच्या या बेकरी युनिटमध्ये अद्ययावत उपकरणांच्या मदतीने स्वच्छ, सुरक्षित वातावरणात शास्त्रीय पद्धतीने पौष्टिक असे ब्रेड, बनपाव, नानकटाई, सुरती बटर, मिल्क टोस्ट, नाचणी बिस्कीट तसेच आयुर्वेदिक कुकीज इत्यादी उत्पादने तयार केली जातात. बेकरी युनिट मध्ये तयार होणार्या औषधाच्या स्वरुपात अन्न या प्रकारात फुले शतावरी, फुले अश्वगंधा, फुले आवळा, फुले पुदिना आणि फुले बेहडा या बिस्किटांचे उत्पादन शास्त्रीय पद्धतीने व संशोधनात्मक स्वरूपात केले जाते. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्या व करोना काळातही सर्वांना उपयुक्त व प्रतिकारशक्ती वाढवणार्या या बिस्किटांचा तसेच या युनिटमध्ये तयार होणार्या इतर खाद्यपदार्थांचा उपयोग विद्यापीठातील व इतर सर्व लोकांनी खाद्य अन्न म्हणून करावा असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले आहे.
या युनिट मार्फत बेकरी तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण व फळे आणि भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञान व्यवसाय प्रशिक्षण असे एक- एक महिना कालावधीचे दोन प्रशिक्षणे सुशिक्षित बेरोजगारांसाठी दिले जातात व त्या मार्फत त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत सहाशे पन्नास पेक्षा जास्त व्यक्तींनी फळे व भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञान प्रशिक्षण घेऊन त्यातील 30 व्यक्तींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे.
बेकरी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दोनशे तीस पेक्षा जास्त युवकांनी पूर्ण करून त्यातील पंधरा युवकांनी स्वतःचा हा बेकरी व्यवसाय सुरु करुन इतरांना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. अशी माहिती अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण यांनी दिली. बेकरी युनिटच्या नानकटाई कुकीज/बिस्किटांना भारतीय बौद्धिक मालमत्ता/संपदा अधिकार प्रमाणपत्र अर्थात पेटंट मिळाल्याबद्दल विद्यार्थी वर्ग, शेतकरी वर्ग तसेच महिला बचत गटातील महिला तसेच अधिकारी वर्ग व बेकरी व्यवसायिकांकडून विद्यापीठाचे कौतुक करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या