अहमदनगर/ जावेद शेख : उम्मती फाऊंडेशनतर्फे नेहमीच सामाजाभिमुख उपक्रम राबविले जातात, नेहमीच विविध समाजातील उपेक्षित घटकांची विविध समाजाभिमुख उपक्रमद्वारे सेवा केली जाते. आपणही समाजाचं काही देणं लागतो या उदात भावनेतून सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या उम्मती फाऊंडेशनच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही उम्मती सोशल वेलफेयर सोसायटी आणि मेमन जमाअत श्रीरामपूर तथा तुलसी आय हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर तालुक्यातील गरजू तसेच गोरगरीब आबालवृद्धांसाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणुन 'मोफत मोतीबिंदू व नेत्रचिकित्सा शिबिराचे रविवार दि.०६ मार्च २०२२ रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत खा.गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूल, वार्ड क्र.२, श्रीरामपूर याठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे.
सदरील शिबिरात नाशिक येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञांकडून मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा, दृष्टिदोष (चष्म्याचा नंबर काढणे) तसेच ईतर सर्व प्रकारच्या नेत्रविकारांवर मोफत चिकित्सा करण्यात येणार आहेत. शस्त्रक्रियेसाठी निवडलेल्या रुग्णांची नाशिक येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिराचे हे ६ वे वर्ष असुन आतापर्यंत उम्मती तर्फे जवळपास २५०० रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आलेले असुन पैकी सुमारे ९५० रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. तरी सदरील शिबिराचा संबंधित रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही उम्मतीचे अध्यक्ष सोहेल दारुवाला तथा मेमन जमाअतचे अध्यक्ष फिरोज पोपटिया यांनी आणि सर्व पदाधिकारी यांनी केलेले आहे.
0 टिप्पण्या