अखेर चिंचोली सोसायटी निवडणूक बिनविरोध; जालिंदर काळेंनी दाखवला मनाचा मोठेपणा

बाळकृष्ण भोसले
राहुरी - तालुक्यातील मागील पाच वर्षांत आर्थिक परिस्थिती सुधारलेल्या अव्वल यादीत गणल्या जाणाऱ्या 'अ' वर्ग डायरीतील विविध कार्यकारी सहकारी संस्थांपैकी चिंचोली संस्थेत सत्ताधारी विखे पाटील गटापैकी जालिंदर काळे गटाने संस्थेचे हित पाहत संस्थेचा साधारण दिड लाख रुपये निवडणूक खर्च टाळण्यासाठी व निवडणूक काळात एकमेकात निर्माण होणारे हेवेदावे व कटुता घालविण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी विनाशर्त संपूर्ण पँनलची माघार घेत बिनविरोध निवडणूक करत चिंचोलीत नवा आदर्श घालून दिला आहे. या निर्णयाचे तालुक्यातून सर्वच स्तरातून तोंडभरून कौतुक होत आहे.
व्हिडिओ पहा: अखेर चिंचोली सोसायटी निवडणूक बिनविरोध, जालिंदर काळेंनी दाखवला मनाचा मोठेपणा...

चिंचोली संस्थेच्या स्थापनेपासून संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र यंदा संस्थेचे हित जपले जावे. सलग नैसर्गिक आपत्ती, कोरोनाचा कहर वरुन येनकेन प्रकारचे संकट यामुळे शेतकरी सभासद वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले असून अनंत संकटात सापडला आहे. एकमेकांना आधार देत प्रगतीच्या, पर्यायाने विकासाच्या रुळावर येण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असते. कुटुंब म्हणून जबाबदारी पार पाडत असताना गावाचीही जबाबदारी पार पाडणे निश्चितच कर्तव्य असते. तोच धागा पकडून या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्वच सभासदांची बिनविरोधचीच अपेक्षा होती.

संस्था पुर्वाश्रमीपासून विखे गटातील दोन गटाकडे आलटून पालटून होती. मात्र ती निवडणूक होवूनच, परंतू मतदान झाले की चहापाणासाठी दोन्ही विरोधी गट एकत्र बसण्याची परंपरा आजही कायम आहे. विरोधी पद्मश्री विखे कारखान्याचे तत्कालीन उपाध्यक्ष दिवंगत पोपटराव लाटे व जालिंदर काळे यांचे गट आमनेसामने राहात. मात्र गावविकासात दोघेही हातात हात घालून काम पाहात हे सर्वश्रुत आहे पैकी पोपटरावांच्या निधनाने समर्थ विकाससाथी निखळला.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नि उमेदवारी अर्जाची अक्षरशः बरसातच झाली १३ जागांसाठी जवळपास ५४ अर्ज भरले गेले. तिथूनच बिनविरोधची सर्कस थांबणार हाच सर्वांचा होरा होता. गत दोन दिवसापासून यावर लहानथोर मंडळींचे विचारमंथन सुरू होते. विरोधी गटाने कधी दोन कधी तीन चा प्रस्ताव देत वरून माघार कुणी घ्यावी हा प्रश्न पुढे आणला. 'नेते जास्त तिथे गावखेड्याचा खोळंबा' या जून्याजाणत्यांच्या म्हणीनूसार जांगडगुत्ता बनला.

ऐनवेळी श्रेयाच्या मुद्द्यावरून 'मी का तू' हा खेळ सावल्यांचा सुरू झाला. अखेरीस मनाचा मोठेपणा दाखवत जालिंदर काळे यांनी सत्तेचा सोपान तुम्ही घ्या पणं गावविकासात संस्थेचा बळी नको म्हणून अख्खा पँनेल मागे घेत असल्याचे जाहीर केले. मात्र ऐनवेळी एक उमेदवारी अर्ज राहिला. त्यामुळे निवडणूक लादली जाते की काय असा संभ्रम निर्माण झाला. परंतु ऐनवेळी दिवंगत पोपटराव लाटे यांचे बंधू भास्कर लाटे यांनीही अतिशय मनाचा मोठेपणा दाखवत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला व निवडणूक निर्विरोधचा मार्ग मोकळा केला. चिंचोलीत या निवडणूकीने एक इतिहास घडला असल्याचे जून्याजाणत्या मंडळींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या निर्णयाचे तालुक्यातील राजकीय जाणकारांबरोबरच अनेकांनी तोंडभरून कौतुक केले आहे.

बिनविरोध निडलेले संचालक सर्वसाधारण मतदार संघातून नलगे संदीप शिवाजी, काळे रामचंद्र माधव, लाटे अरुण रंगनाथ, गागरे शिवाजी निवृत्ती, काळे अशोक भास्कर, पठारे गिताराम कारभारी, कातोरे तात्यासाहेब कारभारी, नलगे महेश भाऊसाहेब अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून भोसले अशोक लक्ष्मण, महिला राखीव मधून काळे रंजना बाबासाहेब, काळे कल्पना संपत, इतर मागास प्रवर्ग मधून काळे प्रमोद जनार्दन, भटक्या विमुक्त जाती मतदार संघातून लाटे सोमनाथ काकासाहेब निर्विरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक नागरगोजे यांनी जाहीर केले. संस्थेचे सचिव प्रदिप काळे यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

जालिंदर काळे गटाचे बाळासाहेब काळे, सरपंच गणेश हारदे, सर्जेराव लाटे, अंकुश पवार, सुनील लाटे तर दुसऱ्या गटाचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक अशोक गागरे, स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष गणेश लाटे, संभाजी आरगडे, बाळासाहेब लाटे, विजय सिनारे, संजय राका, उपसरपंच विलास लाटे, संपत काळे आदी या नेतृत्व करीत होते तर पत्रकार बाळकृष्ण भोसले व किशोर गायकवाड यांची बिनविरोधसाठीची शिष्टाई यशस्वी ठरली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या