मराठी भाषेचा वर्षभर गौरव होण्यासाठी ग्रंथालय चळवळ सक्षम करावी-राज्य ग्रंथालय संघाची मृदू व जलसंधारण मंत्री ना. गडाखांकडे मागणी

अहमदनगर/ जावेद शेख : मराठीचे जतन व संवर्धन करण्याचे काम वर्षोनुवर्ष ग्रंथालये करीत आहेत. त्यामुळे ग्रंथालय चळवळ सक्षम केल्यास मराठीचा वर्षभर जागर होईल. ग्रंथालय चळवळीसमोर आज अनेक समस्या असून ग्रंथालये व ग्रंथालयीन कर्मचा-यांचे प्रश्न सोडवून ग्रंथालय चळवळ सक्षम करावी अशी मागणी 'राज्य ग्रंथालय संघा'चे सदस्य संभाजी पवार यांनी केली.

सार्वजनिक ग्रंथालयाच्या समस्यासंदर्भात संभाजी पवार यांच्या नेर्तृत्वाखाली ग्रंथालय प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांची भेट घेवून ग्रंथालयीन प्रश्नासंबधी सविस्तर चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले. राज्यात १२१४४ ग्रंथालये व २१६१५ कर्मचारी असून गेल्या सहा महिन्याचे वेतन, ग्रंथ खरेदी व आवश्यक बाबीची पूर्तता करण्यासाठीच्या दुसरा हप्ता अनुदानाची पूर्तता मार्च अखेर होणे आवश्यक आहे. तसेच २०१२ पासून राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ झालेली नाही. याकडे संभाजी पवार यांनी मंत्री महोदयांचे लक्ष वेधले.

कोरोना महामारीत विस्कळीत झालेल्या सार्वजनिक ग्रंथालयाकडे आता निवृत्तांच्या जोडीला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीबरोबरच, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थींचा कल वाढत आहे. पण तुटपुंजे अनुदान आणि तेही वेळेत नाही. ग्रंथालयाचे अनुदान वाढ, दर्जाबदल, नवीन मान्यता, कर्मचा-यांना किमान जगण्यायोग्य वेतन व इतर प्रश्न सोडविण्याची मागणी मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डाॅ.गजानन कोटेवार, संभाजी पवार, अमोल इथापे, संदीप नन्नवरे, सुरेखा पवार यांनी केली. शिष्टमंडळात युवाग्राम विकास संस्था, अहमदनगर जिल्हा वाचनालय, दिपा निसळ तालुका, वाचनालय, श्री.कदमराव पवार सार्वजनिक वाचनालय व जिल्ह्यातील सार्वजानिक ग्रंथालय प्रतिनिधींचा सहभाग होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या