पोलीस कारवाईनंतर गुटखा पुन्हा काळ्याबाजारात; कारवाईसाठीचा टोल फ्री क्रमांकाचा पर्दाफाश

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थांवर बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री होताना दिसत आहे. याचे सेवन करणार्यांना सहजतेने उपलब्ध होत आहे. या विरोधात पोलिसांकडून अन्न व औषध प्रशासनाची मदत न घेताच अनेक ठिकाणी गुटख्याचा साठा, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. यानंतर जप्त केलेला गुटख्याचा पुन्हा काळाबाजार करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप हायकोर्टात दाखल फौजदारी जनहित याचिकेत करण्यात आला आहे. तसेच २०१२ पासून राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ उत्पादन, साठा, वाहतूक व विक्रीप्रकरणात २०१२ पासून ते जानेवारी २०२१ पर्यंत ६,४९६ गुन्हे दाखल झाले आणि केवळ ३८६ खटलेच सुरु असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात केवळ कारवाईचा फार्स केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात न्या. व्ही. के. जाधव आणि न्या. संदिपकुमार मोरे यांच्या खंडपीठाने शपथपत्र दाखल करण्याचे राज्य शासनाला आदेश दिले. नगर जिल्ह्यातील राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी औरंगाबाद खंडपीठात गुटखा तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कडक कारवाई करावी. त्यासाठी विशेष पथक असावे. तसेच अन्न व औषध प्रशासनानेच ही कारवाई करावी अशी विनंती याचिकेत केली आहे. ॲड. प्रज्ञा तळेकर आणि ॲड. अजिंक्य काळे यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडली.
हायकोर्टासमोर पितळ पडले उघडे...
    गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांना आळा घालण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात यावे. उत्पादन, साठा, वाहतूक व विक्रीसंदर्भात नागरीकांना तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. याप्रकरणात गृहविभाग आणि अन्न व औषधी प्रशासनाने औरंगाबाद खंडपीठात उत्तर दाखल केले. त्यात टोल फ्री क्रमांक देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. याचिकाकर्त्याने आणि विधीज्ञांनी सदर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता हा क्रमांक अस्तित्वात नसल्याचे समोर आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या