जिद्द नि आत्मविश्वासाच्या बळावर मजूर झाला जेसीबीचा मालक

बाळकृष्ण भोसले
राहुरी - स्वप्न पाहणारी माणसे आपल्याला नेहमी भेटतात पण स्वप्न पेरणारी माणसं कदाचित नाहीच भेटत, पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात पेरुन ते उगवलेलं पाहणारा माणूसचं अत्युच्च प्रगतीचे शिखर सर करतो, मोलमजूरी करुन आपल्या कुटुंबाची गुजराण करणारे अनेक कुटुंब आपल्याला पहावयास मिळतात. परंतू कष्टाची कामे करता-करता जिद्द नि आत्मविश्वास बाळगत ध्येयापर्यंत पोहोचणारी या वर्गातली माणसं क्वचितच आढळतात. अशीच जिद्द नि मनात असलेला आत्मविश्वास या जोरावर ध्येयापर्यंत पोहोचलेल्या कोल्हार खुर्द येथील प्रसाद वाघमारे हा माणूस चक्क जेसीबी यंत्राचा मालक झाला. या ध्येयवेड्या माणसाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

आज कोणतीही वस्तू घेणं अवघड नाही. फायनान्स कंपन्या, बँका अशा वस्तू घेण्यासाठी कर्ज देत असतात. परंतू ती वस्तू घेऊन त्यातून उत्पन्न मिळवत सदरचे घेतलेले कर्ज फेडून कुटुंब चालविणे सहजसोप नक्कीच नाही. हा विचार मांडलाय नव्हे तो स्विकारलाय प्रसाद वाघमारे या अगदी हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य माणसाने.

बऱ्याच दिवसापासून मुळचे पुनतगाव ता. नेवासा येथील व रोजीरोटीसाठी राहुरी तालुक्यातील चिंचोलीत बराच काळ वास्तव्यास असलेले व नुकतेच कोल्हार खुर्द येथे राहावयास गेलेले. आपल्या पत्नी व दोन मुलांसह राहणारे प्रसाद वाघमारे यांनी सुरुवातीच्या काळात मोलमजूरी करत आपल्या संसाराचा गाडा ओढण्यास प्रारंभ केला. पण मनात काही वेगळे शिजत होते. मनातलं कृतीत आणण्यासाठी चिंचोलीतील निलेश भोसले या अतिशय निष्णात व जून्याजाणत्या यंत्रचालकाच्या हाताखाली जेसीबी शिकण्याचा निश्चय केला. तो या यंत्राला धूवून पुसून ते ग्रीस, ऑयल करण्यापासून ते रात्री-अपरात्री रानावनात निर्मनुष्य ठिकाणी राहत मिळेल ते खाऊन पणं यंत्र शिकणारच हि खुणगाठ मनाशी पक्की करतच, त्यानुषंगाने चार-दोन वर्षे त्यांच्या हाताखाली काढत नूसते चालकच नाही तर इंजिनचीही सखोल माहिती करुन घेत इतरांच्या जेसीबी वर कामाला सुरुवात केली. त्यातून ओळखी वाढत गेल्या. त्या ओळखीतून कामे मिळायला सुरुवात झाली. मग पुढे नातेवाईकांचा जेसीबी स्वतः चालविण्यासाठी घेत त्यांचे बँक कर्ज फेडले साधारण आठ दहा वर्षे हे काम करता करता त्यांनी पुर्ण अनुभव मिळविला. मग आता स्वतः चाच जेसीबी घ्यावा अशी खुणगाठ मनाशी पक्की करत उशाशी असलेली जमापुंजी व काही बँकेचे कर्ज घेत नवीनच जेसीबी घेतला.

इतरांच्या जेसीबवर काम केले असल्यामुळे व प्रामाणिक व काटेकोर पणाच्या सवयीमुळे अनेक छोटेमोठे ठेकेदार, व्यावसायिक यांच्या ओळखीचा फायदा कामासाठी नक्कीच होतो. बरोबरच दोन-तीन नवीनच जेसीबी कर्जमुक्त करण्यासाठीचा अनुभव असल्याने व आमच्या घरचेच चालक असल्याने वर्ष-दोन वर्षात यंत्र निश्चितपणे कर्जमुक्त करणार असल्याचे श्री वाघमारे खात्रीने सांगतात. त्यांच्या या भरारीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या