शेतकरी प्रथम कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाला शेतकर्यांचा उत्तम प्रतिसाद

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राबवित असलेल्या नवी दिल्लीस्थित भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम कार्यक्रमाच्या डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरील तांभेरे येथे आयोजीत प्रशिक्षण कार्यक्रमाला शेतकर्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

यावेळी प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, मृदाशास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे, किटकशास्त्रज्ञ डॉ. अशोक वाळुंज, प्रगतशिल शेतकरी अर्जुन डेरे व मेजर ताराचंद गागरे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे यांनी आपल्या प्रास्ताविकात शेतकरी प्रथम कार्यक्रमातंर्गत आयोजीत विविध उपक्रमांचा आढावा घेतला. मृदाशास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन करतांना डाळिंबाची लागवड करण्यासाठी कोणत्या प्रकारची जमीन निवडावी तसेच पाण्याचे व्यवस्थापन कशा प्रकारे करावे या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. दुरगुडे यांनी डाळिंबाच्या उच्च प्रतिच्या उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, जैविक खतांचा व सुक्ष्म अन्नद्रव्य खतांचा वापर तसेच जमिनीची बांधबंदिस्ती याविषयी मार्गदर्शन केले.
डाळिंबावरील किड व रोग व्यवस्थापन या विषयी किटकशास्त्रज्ञ डॉ. अशोक वाळुंज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी डाळिंबावर येणार्या तेल्या व मर रोगाचे व्यवस्थापन कशा प्रकारे करावे तसेच डाळिंब उत्पादनाची पंचसूत्री त्यांनी शेतकर्यांना समजावून सांगितली. या पंचसूत्राचा वापर करुन डाळिंब उत्पादन निश्चितपणे वाढविता येते असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्पाचे संशोधन सहयोगी विजय शेडगे यांनी तर आभार प्रक्षेत्र सहाय्यक किरण मगर यांनी केले.

तांत्रिक मार्गदर्शनानंतर अर्जुन डेरे यांच्या डाळिंब बागेमध्ये चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटीचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये शेतकरी व विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांच्यामध्ये झालेल्या चर्चासत्रात शेतकर्यांच्या प्रश्नांना शास्त्रज्ञांनी उत्तरे दिली. या कार्यक्रमासाठी तांभेरे व कानडगाव येथील 60 पेक्षा जास्त डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते. सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम पार पाडण्यासाठी विजय शेडगे, किरण मगर व राहुल कोर्हाळे यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या