पाचोड बायपासवर परराज्यातील याच ट्रक चालकांना तलवारीचा धाक दाखवत लुटण्यात आले.
◾पाचोड बायपासवरील थरारक घटना; रोख दहा हजार तीन मोबाईल हिसकावले
पाचोड/ विजय चिडे : नादुरूस्त झालेल्या ट्रक जवळ थांबलेल्या परराज्यातील दोन ट्रकमधील चौघांना पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी तलवारीचा धाक दाखवून चालकांसह क्लिनर जवळील नगदी दहा हजार रुपयेसह तीन महागडे अँड्राईड मोबाईल लुटल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड (ता.पैठण) बायपासवरील तुळजाभवानी मंदिराजवळ सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान झटापटीत आरोपींच्या तलवार हल्यात एक जण जखमी झाला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अजमेर राजस्थान येथील रामलाल जाट हे स्वतःच्या मालकीच्या दोन ट्रकमध्ये राजस्थानातून दगडी माती पावडर भरुन आपल्या अन्य सहकार्या सोबत कर्नाटकाकडे जात असतांना औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (५२) पाचोड बायपास वरील तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोर येताच ट्रक क्रमांक (आर.जी. ०१ जी.बी. ९१९४) हा अचानक नादुरुस्त झाला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या मालकाने ट्रक क्र. (आर.जी. ४२ जी.ए.०५२७) हा थांबवून नादुरुस्त झालेल्या ट्रकची पाहणी करुन थांबले असतांना तेवढयात एक तवेरा कार हळूहळू पाहत येऊन गेली.
मग थोड्या वेळात पाठीमागून हिरो होंडा पॅशन या दुचाकीवरुन आलेल्या तरुण वयोगटातील तिघे जण येऊन थांबले. तिघांच्याही हातात धारदार तलवारी पाहून ट्रक मधील चौघे जण भयभीत झाले. त्यांनी हातातील तलवारीचा धाक दाखवत ट्रक मालक रामलाल जाट वय(३०) यांच्या खिशातून रोख दहा हजार रुपये काढून घेतल्यनंतर आरोपींनी बाबुलाल जाट, रेखाराम जाट व अन्य एका सहकार्याजवळ जात त्यांना धमकावत विवो आणि सँमसंग या कंपनीचे नविन तीन महागडे अँड्राईड मोबाईल हिसकावून घेतले. तसेच रेखाराम जाट यांच्या मोबाईलचा पासपोर्टची माहिती जाणून घेण्यावरुन एका आरोपीने तलवारीने वार करुन रेखारामला जखमी केले.
आरोपींनी या घटनेत रोख दहा हजार रुपयेसह तीन महागडे मोबाईल असे साठ हजारांचा मुद्देमाल लुटल्यानंतर तिघेही जण दुचाकीवर बसून अंधारात पळ काढला. काही वेळानंतर परराज्यातील ट्रक चालकांना लुटल्याची वार्ता परिसरात पसरली. त्यानंतर पाचोड पोलीसांना याची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत ट्रक चालकांची भेट घेत, त्यांची चौकशी केल्याचे समजते. दरम्यान याच ठिकाणी दहा दिवसांपूर्वी एका नादुरुस्त ट्रक चालकाला सुध्दा मारहाण करुन ट्रकमधील इंधन काढून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली होती. दरम्यान तलवारीच्या धाकावर ट्रकचालकांस लुटल्याच्या या खळबळजनक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरट्यांचा दुसऱ्या दिवशीही लुटमार करण्याचा प्रयत्न...
नादुरुस्त झालेल्या ट्रकचा इंजिन दुरुस्ती करण्यासाठी या परराज्यातील ट्रक चालकांना घटनास्थळी दोन राञ जागी राहून काढावी लागली. त्यांच्या जवळील मोबाईल पैसे चोरट्यांनी तलवारीच्या धाकाने बळजबरी लुटल्यानंतर त्यांच्या खिशात दमडी शिल्लक नसल्याने त्यांच्यावर आलेल्या उपास मारीचे प्रसंग बघून मंदिराची देखभाल करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या चहा, जेवनाची व्यवस्था केली. दरम्यान सोमवारी (ता.७) पहाटे लुटमार झालेल्या घटनेनंतर मंगवारी (ता.८) मध्यरात्री पुन्हा तवेरा कार अन त्यानंतर दुचाकीवरील तिघे चोरटे हे ट्रक जवळ येऊन थांबले. बहुतेक करुन त्यांना दोन्ही ट्रकमधील इंधन काढून चोरण्याचा बेत असावा परंतु मंदिर मधील काही नागरिक व ट्रक चालक क्लिनर हे जागी असल्याचे पाहून त्यांनी पळ काढला.
0 टिप्पण्या