राहुरी येथील सह्याद्री बेकरीमध्ये चोरांनी डल्ला मारत शिवधन पेटीही केली लंपास

राहुरी/ प्रतिनिधी- राहुरी शहरालगत कॉलेज रोड परिसरात सह्याद्री बेकरी नावाने प्रसाद मुसमाडे व गणेश वांडेकर यांनी गेल्या दीड वर्षापासून बेकरी व्यवसाय चालू केलेला आहे. मंगळवार दि. १५ मार्च २०२२ रोजी सह्याद्री बेकरीचे मालक प्रसाद मुसमाडे यांनी रात्री बारा वाजेपर्यंत बेकरीत काम केल्यानंतर घरी गेले. रात्री तीनच्या दरम्यान सह्याद्री बेकरीचे समोरील बाजूचे शटर लोखंडी रॉडच्या साह्याने सेंट्रल लॉक उचकटून दोन चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश केला व बेकरी पदार्थ बनवण्यासाठी आणलेला किराणा सामान त्यामध्ये ड्रायफूड काजू, बदाम, गावरान तूप व प्रसाद मुसमाडे यांची सोन्याची चैन, वांकी चोरट्यांनी चोरून नेली आहे. हा सर्व प्रकार सीसी टीव्ही मध्ये चित्रित झाला आहे.
      राहुरी शहरामध्ये दुकानांमध्ये मराठा एकीकरण समितीच्या वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, वैद्यकीय मदत करण्यासाठी शिवधन निधी पेटी ठेवलेली आहे. अशाच प्रकारची एक पेटी सह्याद्री बेकरी येथे देखील ठेवण्यात आली होती. त्या पेटीवर चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याप्रसंगी सह्याद्री बेकरीचे मालक प्रसाद मुसमाडे म्हणाले की, आम्ही मोठ्या कष्टाने कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये व्यवसाय बंद राहिला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून चोरी केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चोरीच्या ठिकाणी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, सुरेश तोडमल, भारत टेमक, अरुण निमसे, गणेश उंडे, अमोल वराळे आदींनी भेट दिली.

व्हिडिओ पहा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या