अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी शहरातील राज्य मार्गावर असलेली बसस्थानकाची इमारत मोडकळीस आलेली होती, दूरावस्था झालेली इमारत नव्याने होण्यासाठी बसस्थानकासाठी निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला नुकत्याच झालेल्या अधिवेशनात हिरवा कंदील मिळाला असून 17 कोटी 25 लक्ष रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून पाच कोटी रुपयांचा निधी देखील मिळाला आहे. लवकरच भव्य अशा बसस्थानकाचे काम सुरू होणार असल्याचे माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
30 जानेवारी 2019 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी लेखी निवेदन दिले होते. त्यात म्हटले होते की, नगर मनमाड राज्यमार्गावरील प्रमुख असे एक बस स्थानक म्हणून राहुरी बस स्थानकाची ओळख आहे. परंतु या बसस्थानकाच्या इमारतीला पन्नास वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे. सध्या या इमारतीची अत्यंत दुरवस्था झालेली असून दर्शनी भाग पडलेला आहे. या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करणे अत्यंत आवश्यक आहे. राज्य परिवहन महामंडळाने सुमारे 17 कोटी 50 लक्ष रुपये खर्चाचे नवीन इमारतीचे अंदाजपत्रक तसेच आराखडे तयार केलेले आहेत. यासाठी शासनाने निधी मंजूर करणे आवश्यक आहे, राहुरी बस स्थानकाच्या नवीन इमारतीच्या कामास शासनाकडून निधी मंजूर करण्याची विनंती केली होती.
माजी खा. प्रसाद तनपुरे यांच्या रास्त मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली असून राहुरी शहरात लवकरच भव्य असे बसस्थानक साकारले जाणार आहे. त्यामुळे राहुरीच्या वैभवात आणखीनच भर पडणार आहे, अशी माहिती माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.
0 टिप्पण्या