अपघातात मृत्यू झालेल्या 'त्या' शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मिळाला न्याय


अपघात न्यायाधिकरणाने १४ लाखाच्या नुकसान भरपाईचे दिले आदेश

विलास लाटे/पैठण : शेती व दुध व्यवसाय करणाऱ्या मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मोटार अपघात न्यायाधिकरणाचे न्यायाधीश एस.के.कुलकर्णी यांनी १४ लाख ९८ हजाराची नुकसान भरपाई देण्याचा नुकताच निर्णय दिला. २०१९ मध्ये मृत वैजीनाथ निवृत्ती पेहरकर यांचा रस्त्यावर अपघात झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

वैजीनाथ पेहरकर हे शेती व दुध व्यवसाय करत होते. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्यामागे त्यांच्या कुटुंबीयांनी नुकसानभरपाई मिळावी म्हणून मोटार अपघाती न्यायाधिकरणाकडे दावा दाखल केला होता. न्यायाधिकरणाकडे वकील अॅड. बाळासाहेब नवले व अॅड. अनिल बोबडे यांनी दावेदारातर्फे न्यायालयीन कामकाज हाताळले. अपघाताच्या दिवशी ९ फेब्रुवारी २०१९ रोजी मृत वैजीनाथ पेहरकर हे बोलेरो जीपमध्ये बसून वानेगाव ते गणोरी येथे जात असताना किनगाव फाट्यावरील राजधानी हाॅटेलजवळ त्यांच्या गाडीला विरुद्ध दिशेने येत असलेल्या भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. यात पेहरकर हे गंभीर जखमी झाले. पेहरकर यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ट्रक चालकावर फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी युक्तिवाद करताना दावेदारांच्या वकीलांनी वैजीनाथ पेहरकर हे कुटुंब प्रमुख होते. त्यांच्या उत्पन्नावर त्यांचे संपूर्ण कुटुंब अवलंबून होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

याप्रकरणात मोटार अपघात न्यायाधिकरणाचे न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी प्राधिकरणासमोर आलेले दस्तावेज आणि युक्तीवाद ग्राह्य धरीत या अपघातात ट्रकचालकाने ट्रक बेजबाबदारपणे चालविण्याने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. याप्रकरणी प्राधिकरणाने मृत वैजीनाथ पेहरकर यांच्या कुटुंबियांना ट्रक चालक, मालक व इन्सुरन्स कंपनीने मिळुन १४ लाख ९८ हजार नुकसान भरपाई देण्याचा निकाल दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या