बालानगर बाजारपेठेतील सिमेंट रस्त्याला भराव नसल्याने अपघाताचा धोका वाढला


◾तातडीने भराव टाका; नागरीकांतुन मागणीला जोर

अफसर शेख/बालानगर : पैठण तालुक्यातील बालानगर येथील मुख्य बाजारपेठेत मागील दोन महिन्यांपूर्वी सिमेंट रस्ता बनविण्यात आला. मोठी वर्दळ असलेल्या या रस्त्याच्या साईड पंख्याला मुरुमाचा भराव न टाकल्यामुळे मोठी कसरत करत जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने रस्त्याच्या दोन्ही पंख्याने मुरमाचा भराव टाकून वाहनधारकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.

बालानगर हे बाजारपेठेचे गाव आहे. आसपासच्या परिसरातील अनेक गावांचा संपर्क या गावाशी येतो. त्यामुळे येथे मोठी वर्दळ असते. मागील दोन महिन्यांपूर्वी येथील मुख्य बाजारपेठेत लाखो रुपये खर्चून सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. यामुळे सध्या जमीनीपासुन सुमारे एक ते दिड फुट उंच हा रस्ता उचलला गेला आहे. मात्र, या रस्त्याच्या साईड पंख्याला मुरुमाचा भराव न टाकल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुख्य बाजारपेठ असल्यामुळे याठिकाणी कायम छोट्या मोठ्या वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याचे काम पूर्ण होवून दोन महिने उलटले तरी अद्याप साईड पंखे भरले जात नसल्याने नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे. ठेकेदाराने मुरुम उचलण्याची परवानगी होती तोपर्यंत भराव टाकला नाही. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडले असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. 


आत्ताच वरुन नियमावली आली. त्यामुळे परवानगी देता येत नाही. जो परवानगी देईल त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत. आदेश येतील तेव्हा परवानगी देता येईल, तोपर्यंत नाही देता येणार. सहा-सात दिवसांपूर्वी मुरुम उत्खनन परवानगी बंद केली आहे. तोपर्यंत काय केले त्यांनी. आता जेव्हा शासन आदेश देतील तेव्हाच परवानगी मिळेल.

- दत्तात्रय निलावड, तहसीलदार पैठण


जिल्हाधिकारी आणि तहसीलदार मुरुम उचलु देईना. आम्ही परवानगी मागितली होती. मात्र परवानगी काही मिळेना. ते आमच्या हातात नाही. वाटल्यास तुम्ही विचारुन बघा.

- बद्रीनाथ कळसकर, इंजिनिअर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या