शाश्वत शेतीबरोबरच मानवी जीवन सुरक्षेसाठी उपलब्ध भुजलाचे योग्य नियोजन गरजेचे- उपाध्यक्ष डॉ. ए.के. सिंग

राहुरी विद्यापीठ : जमिनीतील उपलब्ध असलेल्या भुजलाचा 70 टक्के वापर हा शेतीसाठी होतो. उर्वरीत भुजलाचा वापर पिण्यासाठी व औद्योगीकरणासाठी होतो. शेतीमध्ये नत्र, स्फुरद व पालाश या खतांचा वापर दरवर्षी वाढत आहे.

भात शेती तसेच पशुधनामुळे हवेतील मिथेनचे प्रमाण वाढत आहे. याचबरोबर हवेतील वाढत्या कार्बनडाय ऑक्साईडमुळे तापमानात वाढ होत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणजे पावसाचे प्रमाण अनियमित झाले आहे. यावर उपाय म्हणजे उपलब्ध भुजलाचे योग्य व्यवस्थापन केले तर ते शेतीच्या शाश्वततेसाठी व मानवी जीवन सुरक्षेसाठी गरजेचे असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषि विज्ञान अकादमीचे उपाध्यक्ष डॉ. ए.के. सिंग यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे जागतिक बँक अर्थसहाय्यित, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र व भारतीय इंजिनीयर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जल दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. ए.के. सिंग बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील होते. याप्रसंगी गुजरात येथील नवसारी कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. झेड. पी. पटेल अतिथी म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी अहमदनगर इंजिनीअर संस्थचे अध्यक्ष इंजि. एम.एम. आनेकर, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, नियंत्रक सुखदेव बलमे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. दिलीप पवार, कास्ट प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनील गोरंटीवार, आयोजक सचिव डॉ. एस.बी. नांदगुडे, कार्यक्रमाचे निमंत्रक व काष्ट प्रकल्पाचे सह समन्वयक डॉ. एम.जी. शिंदे व कास्ट प्रकल्पाचे प्राध्यापक व कार्यक्रमाचे सहसचिव डॉ. अतुल अत्रे उपस्थित होते.

डॉ. सिंग पुढे म्हणाले की जास्त पाणी लागणार्या पिकांचे उत्पादन शेतकर्यांकडून घेतले जाते. त्याचबरोबर खतांचे प्रमाणही वाढते. यावर नियंत्रण आणले पाहिजे. ठिबकद्वारे खतांचा वापर केल्यास पाणी कमी लागते. खराब पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुर्नरवापर करावा लागेल. शेतीमध्ये वेगवेगळ्या डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करुन भुजलावरील आव्हानांचा आपण योग्य प्रकारे मुकाबला करु शकु. यावेळी डॉ. झेड. पी. पटेल मार्गदर्शन करतांना म्हणाले की पाणी व वाणी ही जपुनच वापरली पाहिजेत. पाण्याचे महत्व सर्वजन जाणतात परंतु आजुनही पाण्याची साक्षरता लोकांमध्ये नाही. सध्या उपलब्ध असलेल्या भुजलाची प्रत उद्योगातील घातक रसायनांमुळे तसेच शेतीतील रासायनीक खतांच्या वारेमाफ वापरामुळे खराब होत आहे. यावर उपाय म्हणजे कमी पाणी लागणार्या पिकांची लागवड करावी लागेल. दिवसेंदिवस अकुंचीत पावणार्या नद्यांची जोडणी करावी लागेल. बोरचे पुर्नरभरण करावे लागेल. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर करणे हीच काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की पाणी हे मानवी जीवनासाठी अनमोल आहे. उन्हाळ्यामध्ये फक्त एक हंडाभर पाणी मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांचा पूर्ण दिवस जातो. त्यासाठी उपलब्ध पाण्याचा वापर योग्य रीतीने व काटकसरीने करायला हवा. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये पाण्याच्या दुर्भिक्षापासून वाचविण्याकरीता सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. डॉ. शरद गडाख यांनी विद्यापीठामध्ये सिंचनाच्या बाबतीत तसेच पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले. इंजि. आनेकर यांनी भारतीय इंजिनीअर संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. डॉ. दिलीप पवार यांनी जागतीक जलदिनाची पाश्वभूमी सांगितली. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शेतीमध्ये तयार केलेल्या डिजीटल तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. यावेळी आचार्य पदवीचा विद्यार्थी सचिन पांडुरंग शिंदे यांने भुजलावरील त्याने केलेल्या संशोधनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नीलम कोंडविलकर व डॉ. रजनी साळुंखे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. सचिन नांदगुडे यांनी केले. या कार्यक्रमानंतर डॉ. ए.के. सिंग व डॉ. झेड.पी. पटेल यांनी कास्ट प्रकल्पाच्या विविध तंत्रज्ञानविषयक प्रयोगशाळांना भेट दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या