कॉलेज कट्टा: भाग 31

आपल्या प्रत्येकामध्ये कधी ना कधी अपराधीपणाची, कमीपणाची, न्यूनत्वाची भावना निर्माण झालेली असते. याला अनेक कारणे असतात, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, तो आहे न्यूनगंड.

न्यूनगंड कट्टा आपल्या महाविद्यालयांमध्ये प्रत्येक वर्गावर्गात असे काही विद्यार्थी असतात की, जे न्यूनगंडाने पछाडलेले, मन व्याधीग्रस्त, मनाने खचलेले असतात. ही थोडीशी मानसशास्त्रीय कल्पना असली तरीसुद्धा ती समजावून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
वास्तविक आपल्या प्रत्येकामध्ये न्यूनगंड असतोच असतो. फक्त तो किती वाढू द्यायचा या गंडावर मात कशी करायची? यावर चर्चा झाली पाहिजे. आधी समजून घेऊयात न्यूनगंड म्हणजे काय?

न्यूनगंड या शब्दात दोन शब्द आहेत पहिला न्यून म्हणजे कमी, कमतरता अर्थात न्यूनता असे म्हणुया. व दुसरा म्हणजे गंड, गंड या शब्दाला इंग्लिश मध्ये complex , साध्या आणि सोपी भाषेत सांगायचं तर न्यूनगंड म्हणजे आपल्या मनात असलेली कमीपणा, आपण स्वतःला इतरापेक्षा कमी लेखण्याची वृत्ती, न्यूनगंड म्हणजे आपल्यात असलेली आत्मविश्वासाची कमतरता.
आपण प्रत्येक काम दोन टप्प्यात पूर्ण करतो, पहिले त्या कामाविषयी मनात एक चित्र बनवतो, नंतर ते काम प्रत्यक्षात पूर्ण करतो... जेव्हा आपण कामाबद्दल चित्र बनवत असतो तेव्हा काही नकारत्मक विचार मनात आणतो. जसे, आपण हे काम करू शकत नाही?, इतका हुशार मुलगा नाही करू शकला तर आपण काय करू शकणार, नापास झालो तर लोक काय म्हणतील?

दोन गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. दुनिया का सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग आणि निंदकाचे घर असावे शेजारी. लोक बोलणार आहेत बोलू द्या, दूसऱ्याच्या बोलण्याने सर्वात जास्त न्यूनगंड निर्माण होतो.
का होतो बरे न्यूनगंड?
आपल्या जीवनात एखादा असा क्षण येतो की, जेथून न्युनगंडाची सुरुवात होते. न्यूनगंड हा फारसा खेड्यातील मुलांमध्ये उद्भवतो, ते स्वत:ची तुलना शहरी मुलांशी करतात. आपल शिक्षण मराठी माध्यमातून झाले, त्याचे इंग्लिश माध्यातून, आपल्याला क्लासेस उपलब्ध नव्हते, 
एक महत्वाचे कारण म्हणजे पालकांनी आपली इतरांच्या मुलाशी केलेली तुलना... तो बघ किती अभ्यास करतो? तो किती हुशार आहे ? तुला काहीच येत नाही, मंद आहेस, बावळट आहेस...

या गोष्टीचा येणारा ताण आपल्यातला न्युनगंड वाढवण्याचे काम करतो...

न्यूनगंड कशाने येतो, कोणी म्हणाले तू बोलताना तुझ्या तोंडाचा वास येतो तर एखादा मुलगा बोलणं थांबवतो किंवा तुझ्या घामाचा वास येतो, आंघोळ केली नाहीस का, काय कपडे घातले आणि त्यामुळे तो इतका नर्व्हस होत जातो की बस. आपण सहज एखाद्याला म्हणतो की तुला अक्कल नाही का? समजत नाही का? बावळट आहेस का? पण याचा मुलांच्या मनावर विपरीत असा परिणाम होतो आणि मग तो स्वतःला बावळट किंवा कमी लेखायचा सुरुवात करतो. शिक्षा म्हणून एखाद्या मुलाला वर्गात एखाद्या शिक्षकाने पहिल्या बाकावर उठून मागच्या बाकावर बसवले तरीसुद्धा त्याला वाटतं की माझा अपमान झाला आणि मग तो स्वतःला कमी लेखायला लागतो. जगात सगळ्यात वाईट काय असेल तर स्वतःला कमी लेखन.

आपण प्रत्येक वेळेस दुसऱ्याचा विचार करत असतो... आपण कधी स्वत:बद्दल विचार करतो काय ? खूपच कमी, न्युनगंडावर मात करायची असेल तर आपले strength आणि weakness यावर पद्धतशीर अभ्यास करायला हवा का?, एक यादी तयार करायची आपल्या strength आणि weakness ची. ती कमी करण्यासाठी काटकसरीने प्रयत्न करायचे.

डोळे उघडे ठेऊन बघितल तर आपल्या सभोवताली अशीच न्युनगंडावर मात करुन यशाचे शिखर गाठलेली अनेक उदाहरणे दिसतील. प्रयेकाने आपल्या न्युनगंडावर मात करून यशावर आरुढ झाले पाहिजे. या बाबतीत सचिन तेंडुलकर चे उदाहरण अत्यंत चपखलपणे देता येईल. जेव्हा त्याला टेनिस एल्बो चा त्रास झाला होता त्यावेळी ट्रीटमेंट घेऊन वेगळी प्रॅक्टिस करून नर्वस नाईन्टी मधून सचिन ज्या पद्धतीने बाहेर पडला, हे न्यूनगंडावर मात केल्याचं अप्रतिम उदाहरण ठरावे.
छोट्या-छोट्या गोष्टीत आपल्याला ही गोष्ट जमणार नाही? येणार नाही? असं वाटतं म्हणजे न्यूनगंड बऱ्याचदा वर उल्लेख केल्याप्रमाणे गरिबी, मी ज्या वातावरणात वाढलो ते वातावरण किंवा एकुणातच काम करायचे नसले तरी सुद्धा न्यूनगंडाच्या गंड येतो. एखादी गोष्ट टाळण्यासाठी सुद्धा न्यूनगंडाची पद्धतशीरपणे मदत घेतली जाते. मला ही गोष्ट जमतच नाही. मला हे जमणार नाही. अशी मनाची धारणा झाली की, माणूस काही केल्या ती गोष्ट करणारच नाही. आणि म्हणून काय लागतं तर मनानी उभारी घ्यावी लागते. त्यामुळे आपण मांजर असले तरी चालेल पण आव मात्र वाघाचा आणावा लागतो. इतरांच्या लेखी आपण काय आहे त्याला काहीच किंमत नाही. आपण आपल्याला कसे दिसतो हे अत्यंत महत्त्वाचे.

आपण सगळ्यांनी गाढव आणि बाप लेकाची गोष्ट चांदोबा या मासिकामध्ये वाचली असेलच. लोक गाढवावर दोघांना किंवा एकाला बसू देत नाहीत, ना ते गाढवाला डोक्यावर घेऊ देतात. लोक त्यांचे काम करतील आपण आपलं काम करावं...

हाथी चले अपनी चाल, चाहे कुत्री किती का भुंकेणात... बऱ्याचदा लोक काय म्हणतील या एका वाक्याने न्यूनगंड झालेली माणसे आपण पाहतो... त्यामुळे लोक गये जहन्नुम्मे... आपण आपल्याला चांगला दिसतो हे महत्त्वाचे.

यश आपलंच असतं... यशाला अनेक बाप असतात. अपयशाचा धनी कोणी नसतो आणि म्हणून अपयश आलं तरी बिघडत काहीच नाही... आणि हो त्याच्याच चुका होतात जो काम करतो... त्यामुळे काम करणार्‍यांच्या चुका होतीलच... मुळात ज्याच्या जास्त चुका होतात तो जास्त काम करतो हे कळलं म्हणजे प्रश्नच येत नाही...

मोटिवेशनचे दोन प्रकार आहेत. एक पॉझिटिव मोटिवेशन आणि दुसरे निगेटिव्ह मोटिवेशन... मोटिवेशन म्हणजे तुलाही जमेल, अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमधून तुला ही गोष्ट जमते असा उत्साह वाढवता येऊ शकतो. लहानपणापासून करायला हवे.

एका स्पर्धेमध्ये एक छोटी मुलगी पाचवी आली आणि तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं की तू जर पहिली आलीस तर तुला बटरस्कॉच आईस्क्रीम मिळेल... स्पर्धेत ती पाचवी आली. ती खूप नर्व्हस झाली आणि मान खाली घालून वडिलांकडे गेली. वडील मात्र अत्यंत उत्साहात खूप छान ...! अरे वा !!! अतिशय उत्तम, तू पहिली आलीस... म्हणून दोन हात कवेत घेण्यासाठी पसरवून तिला बोलवत होते... परंतु ती अत्यंत रडवेली झाली होती, कारण तिच्या दृष्टीने बटरस्कॉच आईसक्रीम तिला मिळणार नव्हतं... कारण ती पहिली आली नव्हती. तिच्या गालावर गंगा-जमुना कधीच वहायला लागल्या होत्या... वडील म्हणाले चल तुला बटरस्कॉच आईस्क्रिम देतो...
ती म्हणाली नाही पप्पा मी हरले... 
ते म्हणाले नाही तू पहिली आलीस!! 
ती म्हणाली... नाही मी पाचवी आली अत्यंत रडवेली होऊन ती डोळे पुसत होती...
वडील म्हणाले किती स्पर्धक होते? 
ही म्हणाली 50 
तू कितवी आलीस ?
ती : पाचवी 
वडील... अगं पहिली आली की तू... आज 45 जणांपैकी आलीस उद्या 48 जनात पहिली आली तर नंतर पन्नास जनात पहिली येशील... चलो एंजॉय बटरस्कॉच आईसक्रीम...
स्टोरी गम्मत म्हणून घ्यायची की गांभीर्याने हे तुमचे तुम्ही ठरवा...

असे पालक असतील तर मुले पुढे का जाणार नाहीत... आपली स्पर्धा आपल्याशीच आहे हे एकदा कळलं की मुलांचा उत्साह द्विगुणित होईल... इतरांशी स्पर्धा ! इतरांशी हेवेदावे... करण्यात आपण आयुष्य खर्ची करतो... दुसऱ्याचं मोठे पण बघने जमावे लागेल... असं होन्यासाठी मनाने अत्यंत मोठे असावे लागते... विशेषत: दुसऱ्याचे यश पचवता आले पाहिजे... दुसऱ्याच्या यशात आपल्याला समाविष्ट होता आले पाहिजे. आपण दुःखात सहभागी होतो तसं इतरांच्या यशात सुद्धा आपल्याला सहभागी होता येईल. म्हणजे खरं तर न्यूनगंड कमी होणे होय. अपयश पचवता यावे लागते असे म्हणतात आणि म्हणूनच आपलं तर पचवता आलं पाहिजे पण दुसऱ्याच यश एन्जॉय करता आले पाहिजे. खुल्या दिलाने पराभव मान्य करायला शिकले पाहिजे.

मागे एकदा appreciating ब्यूटी अर्थात सौंदर्याची वाखाणणी असा उल्लेख केला होता. तो खरं तर अपयशावर किंवा न्यूनगंडावर मात करण्यासाठी उत्तम उपाय ठरू शकतो. न्यूनगंडावर मात करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय लागते तर प्रचंड वाचन केलं की माणसाला काय बोलायचं हे कळतं. काय बोलावं हे कळण्यासाठी ज्ञान असावं लागतं, माणसं वाचावी लागतात. मुळात बडबड्या स्वभाव असणं कधीही चांगलं. असं म्हणतात, की कमी बोलावं पण कमी बोलण्याची काही तोटे होतात आणि म्हणूनच माणसांनी मन मोकळे पणाने निर्धोक बोलत रहावं बोलले पाहिजे...
आपल्या आसपास न्यूनगंड बाळगणारी मुलं आपल्याला सहज शोधता येतात. ती शोधली तर त्यांच्या न्यूनगंडावर मात करण्यासाठी आपण त्यांना किमान प्रेरित केले पाहिजे. मुळात आपला न्यूनगंड शून्य करून नव्हे, तर तो मायनस करून आपण जर पुढे गेलो तर आपलं यश हे नक्कीच आपल्याला मिळेल. यावर मात करूयात !!
आपल्या न्यूनगंडावर मात करूयात. इतरांचा न्यूनगंड कमी करण्यासाठी प्रयत्न करूयात.
ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य: कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य: अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या