कॉलेज कट्टा: भाग 30

निर्भय कन्या कट्टामधील संपूर्ण भाग आपण वाचला असेलच. परंतु मुलींना निर्भय करा! असे म्हणायची वेळ का येते ? याचं कारण, प्रत्येक महाविद्यालयांमध्ये एक लाजराबुजरा कट्टा असतो आणि म्हणूनच आपल्याला निर्भय कन्या अभियान राबवावे लागते. आजच्या कट्ट्याचा विषय लाजरा कट्टा...

प्रत्येक महाविद्यालयांमध्ये काही मुली हो आणि काही मुले सुद्धा अशी असतात की अत्यंत लाजऱ्या बुजऱ्या तेवढ्याच भित्र्या स्वभावाची असतात. आणि म्हणूनच आजचा कट्टा हा या मुलीं आणि मुलांकरिता.

या कन्या कायमच मान खाली घालून चालणाऱ्या, लाजणे हा स्त्रीचा दागिना आहे या आविर्भावात चेहरा लपवून, इकडून तिकडे बागडत असतात. कायम घोळके करून असतात. एकट्यादुकट्या शक्यतो फिरत नाहीत. अभ्यासात अत्यंत तल्लख, हुशार आणि प्रामाणिक असतात. शक्यतो कुठल्याही स्पर्धेत, कुठल्याही ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेत नाहीत. परंतु जर कुठे व्याख्यान असेल, एखादा कार्यक्रम असेल, तर झुंडीने जाऊन कोपरा गाठून टोळक्याने बसतात. आता त्या अशाच का असतात? याला अनेक कारणे असू शकतात. ती सामाजिक असतील, राजकीय असतील, घरगुती असतील वा आहेत. किंवा भारतीय उपखंडातील स्री विषयक जो काही समाज मनाचा भाग आहे. या कन्या अशा होण्याची अनेक कारणं आहेत तशा काही अंशी त्या स्वतः सुद्धा त्याला जबाबदार असतात. सगळा समाजच याला कारणीभूत ठरतो... यांनी असं राहू नये म्हणून महाविद्यालयांमध्ये अनंत उपक्रम घ्यावे लागतात. जसे निर्भय कन्या अभियान, व्याख्यानमाला, मोकळ्या व्हा, बोलते व्हा, हल्लाबोल, असे अनेक प्रकारचे कार्यक्रम महाविद्यालयांमधून घेतले जातात. त्यातून या कन्यांना बोलतं करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.

विशेषता सॉफ्टस्किल सारखा उपक्रम, स्किल डेव्हलपमेंट सारखा उपक्रम, कम्युनिकेशन स्किल्स, सेमिनार, वर्कशॉप, कार्यशाळा, अशा प्रकारच्या उपक्रमांची रेलचेल करावी लागते. या मुलींना बोलते करावे लागतात. हे कर्मकठीण काम असतं पण तरीसुद्धा अनेक महाविद्यालय यावर मात करत राहतात.

या मुलींनी असं राहू नये ? यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात त्यांनी स्वतः प्रयत्न करण्याची आवश्यकता असते मुळात मुलांशी बोलायला घाबरणाऱ्या या मुली शिक्षकांशी सुद्धा बोलू शकत नाहीत. आपलं स्वतंत्र मत मांडू शकत नाहीत. डोक्यात प्रचंड ताकद असते, परंतु ती वापरता येत नाही... आणि म्हणूनच लग्न झाल्यानंतर त्यांचे स्वतंत्र अस्तित्व खूप कमी राहते की काय? असे वाटते. कुठेतरी वि. का. राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्था नावाचे ग्रंथ लिहिला. खरतर ह्या ग्रंथात या सगळ्याची उगमस्थान त्यात दिसतात... लज्जागौरी, कामाख्या एकूणच स्रीची ही रुपे आणि दुसरीकडे असणारी दुर्गा, काली, सप्तशृंगी, दुर्गनिवासी, वरदायिनी, रेणुका, सिंहासनाधिष्ठित अंबा, म्हाळसा... ही भारतीय स्त्रीची दुसरी रूपे वाटत असली तरी सुद्धा तेच खरं रूप दाखवणारी...

मूळ भारतीय संस्कृती मातृसत्ताक...
काळाच्या टप्प्यात ती पुरुष सत्ताक झाली. एकदा स्वामी विवेकानंदांनी एका भाषणामध्ये वक्तव्य केले की आम्ही महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान देत नाही. सभागृहामध्ये शेम शेम च्या गर्जना उठल्या... तेवढ्यात स्वामी म्हणाले, आम्ही बरोबरीचे स्थान देत नाही! याचे कारण आम्ही त्यांना कायम उच्च स्थानावर मानतो... शेम शेम च्या गर्जनेच्या जागा टाळ्यांनी घेतल्या हे सांगायला नकोच... पण ती पडदानशीन पद्धती डोक्यावरचा पदर... ही कारण तर नाहीत ना...
ही आमची मूळ कारणमीमांसा करणारे असेलही... कदाचित... परंतु आपल्याकडे अजिंठा मधील चित्र वेरूळची शिल्प चित्र बघितली तर स्री पुरुष समानता किंवा स्त्रियांना उच्च प्रतीचे स्थान हे अधोरेखित दिसते... आणि म्हणूनच या मानसिकतेतून आपण बाहेर आले पाहिजे.

समान वागणूक दिली पाहिजे... उच्च प्रतीचे स्थान आपल्याला देता आले पाहिजे... म्हणून ताठ मानेने जगणे... निर्भयपणे जगणे यासाठी प्रयत्न करूयात... 
लाजऱ्या मुलींना अगदी लाजऱ्या मुलांना सुद्धा हसत खेळत आपलंसं करून बोलतं करूयात त्यांच्याशी संवाद वाढवू यात...
 चला तर 
बोलते होऊ या !
बोलते करूयात !!

ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य : कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य : अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या