कन्या कटटयातील पुढचा भाग म्हणजे निर्भय कन्या प्रत्येक महाविद्यालयांमध्ये अशा काही मुली असतात, ज्या अत्यंत निर्भय, भयमुक्त, कोणालाही न घाबरणाऱ्या, ताठ मानेने चालणाऱ्या, डोळ्यात डोळे घालुन बोलणाऱ्या, अरे ला कारे करणाऱ्या असतात आणि म्हणूनच या कट्ट्याला नाव आहे निर्भय कन्या कट्टा या विद्यार्थिनी राष्ट्रीय सेवा योजना मधल्या, काही वेळा एन सी सी मधल्या, काही स्पोर्ट मधल्या, कराटे चॅम्पियन, किंवा काही मूळच्याच निर्भय असणाऱ्या या मुली असतात. या मुलींची वैशिष्ट्य म्हणजे त्या कशालाच घाबरत नाहीत. बिनधास्त असतात त्यांचे स्वतंत्र अस्तित्व महाविद्यालयामध्ये डोकावत राहते. अस्तित्वासाठी वेगळा झगडा त्यांचा नसतो. अभ्यासात हुशार असतात, जी ऍक्टिव्हिटी करतील त्या मध्ये हिरीरीने भाग घेतात. रांगोळी काढणे असो, लेझीम पथकात भाग घेणे असो, कलाकार म्हणून एंट्री असो किंवा एखाद्या मुलीची मुलांनी छेड काढली असेल आणि त्या मुलाला धडा दाखवायचा असेल तरी या मुली पुढाकार घेतात.
ओळखायला सोप्या असतात. मेकअप वगैरेच्या भानगडीत पडत नाहीत. जे आहे ते अस्तित्व मान्य करत असतात, खणखणीत आवाज, बिनधास्त वागणं, त्यामुळे आवारात प्रसिद्ध असतात. यांच्या वाट्याला फारसे कोणी जात नाही. पण समजा एखादा वाकड्यात गेला तर त्याची काही धडगत राहत नाही.
डॉ. संभाजी पठारे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक असताना निर्भय कन्या अभियान पहिल्यांदा राबविण्यात आले. या काळामध्ये शिरूर महाविद्यालयात प्राचार्य नंदकुमार निकम यांनी एक आगळावेगळा प्रयोग राबवला होता आणि तो म्हणजे आई महाविद्यालयाच्या दारी आज बऱ्याच महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबवला जातो. मुलीच्या आईने, काकूने, काकीने, आजीने, मावशीने थोडक्यात पालकत्व स्वीकारलेल्या महिलेने महाविद्यालयात यायचं आणि आपली कन्या महाविद्यालय दिवसभर शिकते म्हणजे काय करते? हे समजून घ्यायचं. ही आमची मूळ संकल्पना. कमालीचा यशस्वी प्रयोग सिटी बोरा महाविद्यालय राबवला गेला... त्यानंतर तो जवळजवळ सर्व महाविद्यालयांमध्ये राबवला जातोय.
हल्ली निर्भय कन्या अभियान तर सर्व ठिकाणी राबवले जाते. ज्यामध्ये विद्यार्थिनींना कराटे तायक्वांदो, मार्शल आर्ट, योग ईप्रशिक्षण दिले जाते. एखाद्या पस्तीस किलो वजन असलेल्या मुलीने 85 किलो च्या धटिंगणाला कसा आपटायचा याचं खरं तर हे प्रशिक्षण असतं...
आमच्याकडे छत्रपती पारितोषिक विजेत्या मनीषा धावडे आल्या होत्या आणि त्यांनी मुलींना हे प्रशिक्षण दिलं होतं... मंगळसूत्र (नेकलेस) चोराला कसा बुकलून काढायचा... एखादा छेड काढत असेल तर त्याचं काय करायचं... उसको नानी याद आणि चाहिए... वेळ आली तर... निर्भय कन्या अभियान हे केवळ महाविद्यालयीन तरुणींसाठी नाही तर एकूणच महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राबवले गेले पाहिजे. एक वेळ एखादा विषय कमी शिकवला गेला तरी चालेल पण कन्या निर्भय झाल्या पाहिजेत...
एकदा भाषणामध्ये मी असं म्हणालो होतो की मुलींनी चपला काय फक्त पायात घालायच्या असतात ? वेळ आली तर त्या मुलांच्या गालावर शोभून दिसतात... नंतरच्या एकदा एका रविवारी एका मुलीने फोन करून सांगितले की सर एक पोरगा छेड काढत होता! म्हणून मी त्याला चपलेने हानलाय ! या गेटवर!! पुढे ते प्रकरण मला मिटवत बसावे लागले; हा भाग वेगळा...
पण मला त्या मुलींचे मात्र भारी कौतुक वाटलं. कारण त्या तीन-चार जणी एकत्र येऊन एका मुलाला चांगलेच बदडून काढला होता... पुन्हा त्या मुलांनी मुलींकडे बघायची सुद्धा हिम्मत केली नाही... आम्ही त्या कन्यांचा जाहीर सत्कार केला...
पुढचे जवळपास वर्षभर वातावरण अत्यंत चांगले राहीले... मुलींना अबला... अबला म्हणून आपण किती दिवस अज्ञानी ठेवायचे... खरेतर त्या सबला झाल्याच पाहिजेत... धाडसाने पुढे आल्या पाहिजेत ... मुलांना मारले पाहिजे असा हेतू नाही... परंतु जी मुलं त्रास देतात त्यांना जाणीव मात्र नक्कीच करून दिली पाहिजे. आणि म्हणून हा प्रसंग सांगितला. हा प्रसंग सांगण्याचा हेतु हा केवळ मुली निर्भय झाल्या पाहिजेत हा प्रांजळ आहे... हे आपण समजून घेतलं पाहिजे...
मुलींनी कपडे कसे घालायचे? मुलींनी कसे राहायचे? मुलींनी कसे वागायचे? याचे धडे आपण जास्त सांगत बसतो! खरंतर मुले मुली ही दोन्ही एका रथाची चाके आहेत... पण तरीसुद्धा सगळे नियम मुलींनाच का? याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे...
मागे एकदा आमच्या महाविद्यालयात अमेरिकेमधल्या विद्यापीठातल्या एक विदुषी आल्या होत्या, त्या म्हणाल्या "मला तुमचे वर्ग बघायचे आहेत"! आमचा उत्साह होताच आम्ही त्यांना वेगवेगळ्या वर्गातून फिरवून आणलं. आल्यानंतर अनौपचारिक गप्पांच्या ओघात त्या म्हणाल्या, की "तुमच्याकडे मुली आणि मुलं वेगळी का बसतात"? उत्तर काय देणार! परंपरा! की आणखीन काय ? आपणच विचार करा ! एकीकडे मुली निर्भय झाल्या पाहिजेत ! असे म्हणायचे आणि दुसरीकडे मुलींनी दोन _दोन बाकडे एकत्र करून त्याच्यावर 5_5 जणींनी बसायचं मुलांनी तसंच करायचं आणि आपण मात्र निर्भयाची भाषा करायची! परीक्षेच्या वेळी मुलीच्या शेजारी मुलगा आलेला आपल्याला चालत नाही! कसा चालेल?, कारण आपल्याकडे एकमेव नजर त्या अनुषंगाने असते! वास्तविक स्त्री-पुरुष समानतेच्या या काळामध्ये आपण हळूहळू बदल करायला हवेत. पण तसं होत नाही. आपण जास्त प्रतिगामी होत चाललो आहे की काय? अशी भीती वाटायला लागली आहे? जास्त पुराणमतवादी व्हायला लागला आहे काय? अशी भीती वाटायला लागली आहे.
घरापासून बदल व्हायला हवेत. बंद करायला हवे दादासाठी दूधअंडी अन् ताईसाठी शिळे पाके. हे वातावरण जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत निर्भयता येणार नाही. स्वयंपाक मुलांना शिकवा खरंतर दोघांनाही किचनमध्ये शिकवले पाहिजे. मुलींना पण आणि मुलांना पण. त्याचबरोबर कष्टाची काम सुद्धा दोघांनाही बरोबरीने शिकवली पाहिजेत. आपण जेव्हा परदेशाशी तुलना करतो तेव्हा फक्त परदेशी खाणं आणि परदेशी राहणं एवढंच अंमलात आणतो. परंतु विचारधारा जोपर्यंत अंमलात आणत नाही, विचारांची स्पष्टता त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, स्वावलंबन दोघांना सारखी शिकवत नाही तोपर्यंत ही रथाची चाकं सरळ चालणार नाहीत आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी विचारपूर्वक, जाणीवपूर्वक या गोष्टी मुलींना आणि मुलांना समानते पर्यंत शिकवले पाहिजेत. वेगळे निर्भयतेची धडे मुलींना शिकवायला लावणं हा आपल्या समाजाचा अपमान आहे! असं कुठे तरी वाटलं पाहिजे!!!
चला मुलींना निर्भय करूया...
ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य : कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य : अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
0 टिप्पण्या