कॉलेज कट्टा : भाग 28

अठराशे सत्तावन मध्ये इंग्लंडच्या असेंब्लीमध्ये विद्यापीठ कायदा मंजूर झाला आणि आपल्याकडे तीन विद्यापीठांची स्थापना झाली, महाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थ्यांना मिळू लागले. अर्थातच त्यामध्ये त्या काळामध्ये मुलींना प्रवेश नव्हता. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले दाम्पत्याने केलेले कार्यकर्तृत्व आणि घातलेला स्त्री शिक्षणाचा पाया पाहता आजचा विचार करायला हवा आजच्या कट्टयाचा विषय आहे कन्या कट्टा...

१९३३ मधली गोष्ट, भारतातील पहिल्या स्त्री-शास्त्रज्ञ कमला सोहोनींना बेंगळुरूच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स'मध्ये स्त्री असल्यामुळे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रवेश नाकारला गेला होता; पण ही गोष्ट दुर्मीळ नव्हती. १९व्या शतकात सोफिया कोवालेवस्काया या रशियन गणितज्ज्ञ स्त्रीला गणिताच्या अभ्यासाची संधी स्त्री म्हणून नाकारली गेली होती. रशियाबाहेर जाऊन हा अभ्यास करण्यासाठी, सोय म्हणून तिला व्लादिमिर कोवालेवस्की या विद्वानाशी विवाह करावा लागला होता.

आज आपण बघतो आहोत की प्रत्येक महाविद्यालयांमध्ये किमान पन्नास टक्के काही ठिकाणी त्याहून जास्त कन्या शिकताना दिसतात. अनेक महाविद्यालय ही कन्या महाविद्यालय म्हणून प्रसिद्ध आहेत. कन्या कट्टा मध्ये अनेक विषय चर्चेचे असतील किंवा यामध्ये अनेक कंगोरे आहेत ते म्हणजे निर्भय कन्या, लाजऱ्या बुजऱ्या कन्या, अभ्यासू कन्या, टपोरी कन्या, बिनधास्त कन्या अर्थात मानवी स्वभावाचे जेवढे म्हणून कंगोरे आहेत ते सर्व या विषयाला वाहू शकता येतील...

वैदिक काळामध्ये किंवा बौध्द काळामध्ये आपल्याकडे भारत उपखंडामध्ये स्त्रियांना उच्च दर्जाचे स्थान होते हे अधोरेखित आहेच. विशेषत: लीलावती, ऋषिका जुहू, विश्वावरा, आत्रेयी, मैत्रयी, या व अशासारख्या अनेक विदुषी या उच्चशिक्षित होत्याच. परंतु मुघल आक्रमणाच्या व नंतरच्या काळात आपल्याकडे स्त्री शिक्षणाचा पाया पूर्णपणे ढासळला. पडदाशीन पद्धती आली. डोक्यावरून पदर घेणे हे आज संस्कृतीचे लक्षण वाटत असलं तरीसुद्धा ती पडदानशीन पद्धती आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. त्याचा शिक्षणावर परिणाम झाला. कन्या कट्ट्यावर आपण जरी बोलणार असलो, तरीसुद्धा या विषयावर पुस्तक लिहून होतील एवढे बोलण्यासारखं आहे. विशेषत: पुरुषी मानसिकता आणि एकूणच आपली भारतीय संस्कारांची जडण-घडण यामुळे या विषयावर खूपच सांगोपांग चर्चा होणे आवश्यक आहे.

ही चर्चा आपण वेगळ्या पातळीवर नेऊयात. हा कट्टा आपण काही प्रसंगांनी खुलवण्याचा प्रयत्न करणार आहोत... एकतर्फी मी विचार करण्यापेक्षा आपण सगळे मिळूनच छोट्या छोट्या प्रसंगातून छोट्या छोट्या कथांमधून विचार करूयात. हे प्रसंग म्हणजे नुसते प्रसंग नाहीतच मुळी. तर या आहेत कथा, लघु कथा, सूक्ष्म कथा, आपण त्याला अति लघुत्तम कथा म्हणुयात त्याचे संक्षिप्त रूप अलक...
अलक अगदी चार ओळी सारखे, कथा वाटली, अतिसूक्ष्म दिसत असली तरी सुद्धा गर्भितार्थ मोठा सांगून जाते आणि म्हणून कथेकडे वाचकाने आपल्याला काय वाटतं? या अंगाने वाचावे! प्रसंग डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करावा ! आपण त्या भूमिकेत जावं! म्हणजे कथा समजून घेणे सोपे जाईल! कथेला प्रत्येक ठिकाणी क्लायमॅक्स असेलच असे नाही. परंतु तरीसुद्धा कथेचा गर्भितार्थ मात्र खूप खोलवर समाज व्यवस्थेचा एकूणच मानववंशशास्त्राच्या अभ्यास करायला भाग पाडणारा आहे...

कथा काही ठिकाणी संवाद रूपाने काही ठिकाणी पत्ररूपाने काही ठिकाणी केवळ प्रसंग सांगून तर काही ठिकाणी संवाद माध्यमातून सांगितली गेली आहे... मी काही कथाकार नाही त्यामुळे हा प्रयोग कृपा करून समजून घ्याल ही अपेक्षा आहे चला तर पहिल्यांदा कथा वाचूयात..!!

अति लघुत्तम कथा: एक
पालक: "सर, माझी मुलगी तुम्ही म्हटला त्याप्रमाणे मागच्याच वर्षी पीएच. डी. झाली. पण, घरी एक मोठा प्रश्न निर्माण झालाय."?
"आम्ही, तिच्या लग्नाचे बघतोय",
.
.
 "पण सर, तुम्हाला तर माहितीच आहे. आमच्या जातीत एवढी शिकलेली मुलंच मिळत नाहीत"

अलक 2
पोलीस : "सर, मुलगी पळवून नेल्याची जी केस होती,
 त्या मुलाच्या पालकांनीच आज केस टाकलीय की, "माझा मुलगा अल्पवयीन आहे आणि मुलीनेच मुलाला पळवून नेले आहे"

अलक 3
शिक्षक : "हॅलो, xy अहो, तुम्ही परीक्षेचा फॉर्म का नाही भरला?" 
तिकडून...
Xy : "कोण, बोलतोय रे !!! काह्याला माह्या बायकुला फोन केला ?
"कळत नाही का" "पुन्हा फोन करायचा नाही!!! सांगून ठेवतो... ठीव फोन" ...
खट्याक फोन बंद............!

अलक चार
शिक्षक: "हॅलो, xy आहे का?"
तिकडून
बहीण : "काहों सर, आज आठवण केलीत...
शिक्षक: "नाही; त्याने अजून प्रवेश घेतला नाही ना म्हणून...बोलायचे होते...
बहीण: फार उशीर केलात ! मागच्याच महिन्यात तो सोडून गेला...
लॉक डाऊन नसते तर ही वेळ आली नसती...

अलक पाच
महाविद्यालयाची सूचना एसएमएस...
"उद्यापासून सर्व विद्यार्थ्यांनी, ऑनलाइन जॉईन व्हायचे आहे, यासाठी तुम्हाला अँड्रॉइड फोन किंवा स्मार्टफोन कंपल्सरी लागणार आहे...
कन्येची नोट: मला माफ करा मला फोनची गरज नाही...

अलक सहा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदवीप्रदान कार्यक्रमात देण्यात आलेल्या 48 सुवर्णपदका पैकी 42 सुवर्णपदके विद्यार्थीनींनी पटकावली एक बातमी...

अलक सात
बापाच्या प्रेताला अगीनडाग देताना बहिणीनी भावाला हात लावू दिला नाही बातमीदाराने ही बातमी थोरल्या अक्षरात पहिल्या पानावर मोठ्या मथळ्याखाली मागच्या आठवड्यात छापली...
माय सावित्री तुला जाऊन किती वर्ष झाली त्यावेळी ज्योतिरावांच्या अंत्ययात्रेत तू टीटवे धरलं होतंस...!!!
अंत्यसमयीच्या बातमीत गेल्या सव्वाशे वर्षात काहीच फरक पडला नाहीये...

अलक आठ
मुलगा: "सर, त्या xy आणि xx दोन मुली मला रोज चिडवतात! माझी छेड काढतात! भावड्या म्हणून टाळी वाजवून पळून जातात... सर यांचं काही तरी करा... यांना पोलासात द्या"

अलक 9
" मुलींच्या पायात, चपला या काय फक्त पायात घालण्यासाठी असतात, त्या मुलांच्या गालावर सुद्धा शोभून दिसतात" एक वक्ताचे टाळ्यांच्या गजरात... व्याख्यान संपन्न...
दोन दिवसांनी...
मुलगी: सर, हानलाय चपलेने एकाला... , छेड काढत होता... या गेटवर

दोस्तहो कथा फक्त नऊच सांगितल्यात त्याही वानगी दाखल थोड्या मासलेवाईक... या हजारो सांगता येतील... रोज क्षणाक्षणाला घडणाऱ्या या कथा आपल्या अवतीभवती, आपल्या बहिणीच्या भावाच्या, मैत्रिणींच्या, सहाध्यायी मैत्रिणींच्या, सहवासात घडणार्‍या कथा चांगल्या-वाईट, सर्व प्रकारच्या. कथांवर विचार करूयात... म्म आपली मते जरूर प्रदर्शित करूयात... काही कथांचा भाग आपण तर नाहीत ना याचा विचार करूया...

ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य : कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य : अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या