कॉलेज कट्टा: भाग 26

परीक्षेच्या कट्ट्या विषयी आपण खूप सविस्तरपणे बोललो. पण मग प्रश्न उरतो परीक्षेच्या कट्ट्याला पर्याय काय ? परीक्षा ही तर काळाची गरज आहे. पण मग याला पर्याय शोधता येतील का? परीक्षेला पर्याय काय? हा अत्यंत टोकाचा प्रश्न वाटणं सगळ्यांना स्वाभाविक आहे. परंतु हे पर्याय आपल्याला उभे करता येऊ शकतात का? आजचा कट्टा परीक्षा विना कट्टा. आपण प्रत्येकाने लहानपणी परीक्षा नसत्या तर? या विषयावर कधीनाकधी निबंध, वक्तृत्व किंवा वाद विवाद स्पर्धेमध्ये हा विषय हिरीरीने मांडला आहे. त्यावेळी कल्पनेचे धुमारे जरी वाटत असले, तरीसुद्धा आज त्याची किती गरज आहे? हे प्रकर्षाने जाणवायला लागले आहे.

आपल्याकडच्या परीक्षा चुकीच्या आहेत का ? उत्तर देणे कठीण आहे. पण आपली चेष्टा मात्र केली जाते. डॉ. नरेंद्र जाधव नेहमी म्हणत असत की, शिक्षण आणि समाज यामध्ये एक मोठी दरी निर्माण झालेली आहे. दरी कमी करायची असेल तर, समाजाभिमुख किंवा जीवनोपयोगी किंवा जीवनशैली युक्त शिक्षण विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजे. आता पुन्हा प्रश्न येतो शिक्षण द्यायचं म्हणजे काय करायचं ? शिक्षण दिले गेले की, नाही? हे बघण्यासाठी पुन्हा आल्या त्या म्हणजे परीक्षा...

शिक्षण आणि समाज असं डॉ. रावसाहेब शिंदे यांनी खूप सुंदर पुस्तक लिहिलेले आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ जे पी नाईक शिक्षण आणि समाज हे नियतकालिक चालवत असत. नंतरच्या काळात चित्राताई नाईकांनी आणि अर्थातच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ने हेच पुढे चालवलं यामध्ये अनेक प्रश्नांची उकल होत असे. मूळ प्रश्न काय तर आपल्याकडे एक चेष्टेचा सुर आढळतो, तो म्हणजे इंजीनियरिंग झालेल्या मुलाला मिक्‍सर दुरुस्त करता येत नाही. कॉमर्स मध्ये पीएचडी झालेल्या मुलाला बेअरर चेक आणि क्रॉसचेक यातला फरक सांगता येत नाही. किंवा फिजिक्स मध्ये पीएचडी झालेल्या मुलाला ट्यूबलाइट लावता येत नाही. म्हणजेच काय की, आपण बोलतो एक आणि करतो वेगळं. आपल्यातला बोलण्याचा सूर मुळात अभ्यासक्रम हे जीवनाशी निगडित असावेत असं प्रत्येकाला वाटत राहतं पण जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र तसं घडत नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मागच्या महिन्यामध्ये डॉ. प्रमोद धांडे यांनी एक परिसंवाद घेतला होता, त्यात त्यांनी परीक्षा कशा घ्यायच्या? किंवा परीक्षेचे मूल्यमापन कसे करायचे ? म्हणजेच उत्तर पत्रिका कशा तपासायच्या ? आणि प्रश्नपत्रिका कशा काढायच्या ? यासंदर्भात अमेरिकेमध्ये असलेल्या एका संस्थेचा आवर्जून उल्लेख केला होता. ही संस्था ही केवळ संस्था नसून तिथे काही शेकडा माणसं यावर काम करतात. विशेषत: मानसशास्त्रावर आधारित खूप लोक या संघटने मध्ये काम करतात. असा उल्लेख त्यांनी केला होता.
प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, असे आपण सहज बोलून जातो, पण खोलात जाऊन विचार केला तर त्याला जास्त किंमत मोजावी लागते.

आता हा विषय दिसतो तेवढा सोपा नाही. एकदा एका प्रश्न कर्त्याने विद्यार्थ्याला विचारले की बापू को जेल क्यूँ हुयी ? विद्यार्थ्यांनी उत्तर दिले बापू ने xxxx किया था ! विद्यार्थ्याने उत्तर देताना आसाराम बापू डोक्यात घेतले. आणि प्रश्नकर्त्याला महात्मा गांधींबद्दल प्रश्न विचारायचा होता... म्हणजेच प्रश्न विचारताना तो सोप्या भाषेत विचारला गेला पाहिजे. प्रॉब्लेम आर्किटेक्चर किंवा क्रिएटींग प्रॉब्लेम, किंवा क्रिएशन ऑफ प्रॉब्लेम, किंवा प्रॉब्लेम चा प्रॉब्लेम हे आपल्याकडे प्रश्न आहेत. हे आपल्याला समजायला हवं. आणि म्हणूनच मागच्या दोन लेखांमध्ये आपण एम सी क्यू बद्दल जे प्रश्न निर्माण केले? ते का तयार झाले ? तर अत्यंत साधेपणाने m.c.q. विचारले जातात का? m.c.q. तयार करण्याची प्रशिक्षण खरं तर आपण घ्यायला हवी होती का? किंवा द्यायला हवी होती का? ती दिली न गेल्यामुळे कदाचित हे प्रश्न तयार झालेले असावेत. शिवाय मुलांची सुद्धा मानसिक अवस्था हे सुद्धा आपण विचारात घेतले नाही आणि म्हणूनच आपल्याकडे अनंत प्रश्न... निर्माण झालेत.

आम्हाला एन. सी. राणा नावाचे एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ एका कोर्स ला शिकवायचे. ते शिकवत असताना त्यांनी एक प्रश्न आम्हाला दिला होता!! जो परीक्षेसाठी होता आणि आठ दिवसात त्याचे उत्तर द्यायचं होतं! "उत्तर कुठूनही शोधून आणा!" "कोणाशीही चर्चा करा"! कुठेही बसा ग्रंथालयात जा त्यावेळी गूगल असं काही नव्हतं. पण खरं सांगतो दोस्तहो त्या प्रश्नाचे उत्तर त्या काळामध्ये आम्हाला त्यांच्या अख्या पुस्तकात कुठेच सापडले नव्हते. नंतर त्यांनी ते आम्हाला दिले. अत्यंत सोपं होतं फक्त काय होतं तर लॉजिक नीट लावायचं होतं. लॉजिकल थिंकिंग या विषया पासून आपण दूर जातोय की काय? ओपन बुक टेस्ट हा एक पर्याय परीक्षेला असू शकतो ? पुन्हा एकदा त्याच 3 idiot ची आठवण येते की, राजू आणि फरहान ही दोन नावं त्या पुस्तकात कुठेही नसताना व्हायरस आणि चतुर सारखी मंडळी ती फक्त त्या पुस्तकात शोधत राहतात... कोणीही, प्रश्न काय आहे? याचा विचार करत नाही ... मार्कांसाठी सुरू राहते उंदीर शर्यत...

अर्थात परीक्षेला पर्याय एकमेवाद्वितीय असा असू शकत नाही. यासाठी अनेक पर्याय संकल्पने आपल्याला वापरता येतील. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची घेतलेली परीक्षा शिक्षकांनी त्या त्या वेळी त्या त्या प्रकरणावर त्याची जुजबी घेतलेली परीक्षा! तोंडी असेल लेखी असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून असेल या सगळ्यात महत्त्वाचं असेल ते आउटपुट...

आउटपुट दाखवण्याच्या अनेक पद्धती असू शकतात. जसे पावर पॉइंट प्रेसेंटेशन, सेमिनार, वेगवेगळ्या प्रकारचे सादरीकरण, तोंडी, परीक्षा वर्तमानपत्रात लिहिलेले लेख, आकाशवाणी वरची भाषण, संशोधनपर प्रसिद्ध झालेले लेख, निबंध, प्रबंध, वक्ता म्हणून केलेली भाषणे, इतर पद्धती, अगदी लेखी परीक्षा सुद्धा.

या सर्व प्रकारातून या विद्यार्थ्यांची चाचणी केली जाऊ शकते. चाचण्या ह्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्या जाऊ शकतात. सगळ्यात शेवटी सगळ्या अभ्यासक्रमाची एकत्रित जुजबी का होईना पण चाचणी घेतली जाईल. यातून या विद्यार्थ्यांची एकूणातच सर्व प्रकारच्या स्किल ची माहिती ही शिक्षकाला मिळू शकेल. मला हे मान्य आहे की आपल्याकडे विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे हे थोडे कठीण जाईल. परंतु कठीण करा रे सायास ... आणि म्हणून हे साहस करायला हरकत नाही. यावर आणखी काही पर्याय असू शकतात ते पुढच्या भागात...
चला तर परीक्षेला पर्याय शोधूयात... नव्या शैक्षणिक धोरणात यावर बरीच चर्चा केलेली आहे त्यावर ही चर्चा करूयात...

ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य : कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य: अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या