मागील दोन वर्षात covid-19 ने अर्थात कोरोनाने, चांगलाच धुमाकूळ घातलाय. मार्च महिन्यात दोन तीन पेपर सुरळीत झाले न झाले तोच अचानक लॉकडाऊन सुरू झाले. ऑनलाइन परीक्षेचे वारं सर्व जगभर फिरलं ते आपल्याकडे ही वावटळीसारखे घोंघावत आले. पहिल्या वर्षी तर परीक्षा झाल्याच नाहीत. मुलांना वरच्या वर्गात अलगद ढकलन्यात आले. अर्थातच आजचा कट्टा आहे ऑनलाईन परीक्षेचा कट्टा... आपण या कट्टयामध्ये ऑनलाईन परीक्षा, आणि थोडासा का होईना, पण ऑनलाईन शिक्षणाचा उहापोह करणार आहोत...
पुढच्या सत्रामध्ये सर्व शिकवणं ऑनलाईन सुरू झाले. सुरुवातीच्या काळात सगळ्यांनाच उत्साह होता. काय मजा असायची त्या झूम च्या मीटिंग, ती गुगल मीट, वेबेक्स, व्हाट्सअप कॉलिंग, चॅट, फेसबुक लाईव्ह, युट्युब लाईव्ह अनेक जणांची मजल ही एल एम एस पर्यंत गेली. नव्याचे नऊ दिवस सरत आले, आणि तक्रारींचा पाढा सुरू झाला.
निट आवाज येत नाही?
नेट कनेक्शन नाही?
बॉक्स मधले समजत नाही? वगैरे... वगैरे... वगैरे...
शिकणारी न शिकवणारे उत्साही होते. त्यांनी अत्यंत मन लावून सगळे केले. पण ज्यांच्या आडातच नव्हतं तर पोहऱ्यात कुठून आणणार. म्हणून त्यांनी नाना क्लुप्त्या शोधल्या. त्या म्हणजे ऑनलाईन दिसायचं पण बसायच नाही. व्हिडीओ ऑन करायचाच नाही आणि मग सुरू झाला एक अनघट वाटेचा प्रवास...
मधल्या काळात एक विद्यार्थिनी माझ्याकडे आली अन् म्हणाली सर मला विषय बदलायचे आहेत. मी म्हणालो "अर्ज करा?, ती म्हणाली तयार आहे. अर्ज माझ्यासमोर दिला तीन ओळींचा अर्ज होता. सर मला विषय बदलायचे आहेत, बदलून मिळावे, आपली विद्यार्थीनी....xyz...... येवढाच अर्ज.
मी म्हणालो, "अहो हा अर्ज कोणाला केलाय?, काय केलाय,? कुठले विषय बदलायचे, वर्ग कुठला?" अशी चर्चा केली. पुन्हा अर्ज लिहून घेतला हा भाग वेगळा.
पण लक्षात आले. अकरावी आणि बारावी ही विद्यार्थीनी महाविद्यालयातच झालेली नव्हती. म्हणजेच कोरोनातील शिक्षणाचे बळी असं म्हणायला हरकत नाही. कोरोना च्या बाबतीत कोणालाच दोष देता येणार नाही कारण यात एकट्या कोणाचा दोष नाही. सगळ्यांनीच शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले का अशी शंका येते आहे. बाकी सगळे चालू असतांना महाविद्यालय मात्र बंद. शाळा बंद. एक पर्याय म्हणून आपण सगळ्यांनी ऑनलाइन शिक्षण घेण्याचा देण्याचाही प्रयत्न केला. त्यातही अनेकांना सोशल मीडियाचा वापर किंवा ऑनलाईन शिक्षण कसं द्यायचं याची माहिती नव्हती. परंतु आपापल्या पद्धतीने आपण त्याला जुगाड म्हणूया शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला तर कुठेतरी नकारात्मक घंटा ऐकायला येते.
अनेक मुलांकडे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, कम्प्युटर, संगणक, मोबाईल असे नव्हते तरी त्यांना शिकायला आपण भाग पाडत होतो. नंतर यावर मात झाली सुद्धा परंतु पाहिजे त्या प्रमाणात नाही. मागच्या महिन्यात महाविद्यालय चालू झाली परंतु एस. टी. च्या संपामुळे अनेक विद्यार्थ्यांना अजूनही वर्गात येता येत नव्हते. ऑनलाइन परीक्षा सुरू झाल्या अनंत अडचणींवर मात करत या परीक्षा सुरू झाल्या खऱ्या पण घ्यायच्या कशा? याच्यावर सांगोपांग चर्चा झाल्या. यामध्ये m.c.q. अर्थात बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घ्यायच्या असं जवळजवळ सगळ्यांनी ठरवलं.
मुलांनी ही परीक्षा सोपी वाटली असणार, प्रश्न??? खालील चार उत्तरे त्यातले एक निवडायचं पुढे चालायचे! खरं तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांना हे तर अगदीच किरकोळ वाटत असणार. सुरुवातीला साध्या पद्धतीने परीक्षा झाल्या. नंतर, प्रॉक्टर पद्धतीने आल्या. त्याच्यात अनेक घडामोडी घडल्या.
सकाळी पेपर जॉईन करायचा, नेट बंद आहे म्हणून पुन्हा जॉईन करायचा! अनेक क्लुप्त्या विद्यार्थ्यांनी काढल्या. अत्यंत प्रामाणिक पणे काही जणांनी परीक्षा दिल्या. तर काही जणांनी मात्र ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार केले. जसे गुगलिंग करून, किंवा मित्रांचे, घरातल्यांचे मोबाईल वापरून, किंवा टीव्ही स्क्रीनचा वापर करून, अनंत प्रयोग पुन्हा ते मी का सांगत बसलोय असा मलाच प्रश्न पडेल ?
सरासरी परीक्षांचा निकाल बारा टक्के पासून साठ सत्तर टक्क्यांपर्यंत लागतो. पण ऑनलाईन परीक्षांचा निकाल मात्र सगळ्याच परीक्षांचा सगळ्याच वर्गांचा ९०% वर लागला काही तर शंभर टक्के. जे विद्यार्थी दहा दहा वर्ष परीक्षेत पास होत नव्हते ते सुद्धा पास झाले. नुसती पास नाही झाली तर चांगल्या गुणांनी पास झाली, आणि म्हणून काही तज्ज्ञांनी या परीक्षांवर आक्षेप घ्यायला सुरुवात केली मात्र विद्यार्थी जाम खूष होते...ऑनलाइन परीक्षेत नापास होऊन दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी घोषणा जाहीर करावीशी वाटली...
पुन्हा ऑफलाईन परीक्षेचे वारे सुरू झालं, पुण्यामध्ये काहीजणांनी विद्यार्थ्यांचा सर्व्हे घेतला आणि आश्चर्य असं की 83 टक्के पेक्षा जास्त मुलांनी परीक्षा ऑनलाईन घ्या असे सांगितले. ऑनलाइन परीक्षा घेण्याचे फायदे म्हणजे शंभर टक्के निकालाची हमी. असं काहीसं झाले की काय? याचा विचार करायला हवा. त्याअर्थी आपण परीक्षा देण्या घेन्यामध्ये कुठेतरी कमी पडलो, हे आपल्याला मान्य करावे लागेल.
या सगळ्याच्यामध्ये मुळ परीक्षा पद्धतीवरच आपल्याला आता बोलावं लागणार आहे. नव्हे नव्हे परीक्षा पद्धतीच्या अंमलबजावणी बद्दल आपल्याला सतत सतर्क राहावे लागणार आहे. शेवटी शिक्षणाचा मूळ हेतू काय तर विद्यार्थी शिकला पाहिजे.
आपण कितीही प्रॉक्टर पद्धतीने किंवा अनेक बंधने घालून परीक्षा घेतल्या तरीसुद्धा विद्यार्थी त्यांचे पर्याय शोधून उत्तर शोधून ती लिहितो आहे. तर खूप चांगल्या मार्कांनी पास होत आहेत. जेव्हा हीच मुलं मागचे काही महिने वर्गात आली त्यावेळी या मुलांना साधे अर्ज करता येत नव्हते! बऱ्याच जणांना नीट लिहिता येत नव्हतं ! इंग्रजीत नाव जाऊद्या मराठी सुद्धा नीट लिहिता न येणे हे कुठेतरी धोक्याची घंटा वाजवणारे आहे. लिखाण जाऊद्या परंतु जुजबी का होईना आपल्या विषयातली माहिती असणं हे सुद्धा होत नाही. अर्थात मी जे बोलतो आहे, मी जे लिहितो आहे, ते वानगीदाखल काही विद्यार्थ्यांच आहे. काही विद्यार्थी चांगले आहेतच. त्यांच्याविषयी वाद नाही. परंतु आपण जेव्हा वर्गात शिकवतो, त्यावेळी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या हृदयाची बात त्या हृदयी पोहोचणे यासाठी शिकवतो. आणि म्हणूनच ज्ञान एका हृदयातून दुसऱ्या हृदयात गेले पाहिजे. असं काहीसे व्हायला हवं. परंतु ते होताना दिसत नाही.
कारण ऑनलाइन पद्धतीच्या शिकवण्याच्या अनेक मर्यादा बद्दल अनेक जण आत्तापर्यंत बोललेले आहेत त्यावर लिहिलेल आहे. यावर खूप सांगोपांग चर्चा झालेली आहे. या सगळ्याला पर्याय काय?
मुळात परीक्षेला पर्याय काय? हा मूळ प्रश्न आपल्याला हाती इथून पुढे घ्यावा लागणार आहे.
चला तर ऑनलाइन /ऑफलाइन जमलं तर हायब्रीड किंवा परीक्षेलाच पर्याय शोधूयात वेगवेगळ्या प्रकारे...
ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य: कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य: अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
0 टिप्पण्या