राहुरी शहर/ अशोक मंडलिक : तालुक्यातील कोंढवड तलाठी कार्यालयासह 13 गावांमध्ये तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठी सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे.
यामुळे राहुरी तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालय अद्यावत होण्यार आहे. तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालये अडचणीची व अडगळीची बनली आहे. निधी मंजूर झाल्याने तलाठी कार्यालये उभारणीचा कार्यक्रम लवकरच हाती घेतला जाणार आहे. यामध्ये तालुक्यातील कोंढवड, डिग्रस, धामोरी बुद्रुक, कात्रड, सोनगाव, निंभेरे, तांभेरे, कानडगाव, आरडगाव, उंबरे, केंदळ बुद्रुक, मानोरी, पिंप्री, वळण या गावांचा समावेश आहे.
या तलाठी कार्यालय उभारणीसाठी सुमारे प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी मिळणार असून तलाठी कार्यालय सुसज्ज होणार आहेत. जागेच्या अडचणी व नैसर्गिक आपत्तीचा सामना तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना करावा लागत होता. कार्यरत असलेल्या तलाठी कार्यालयात पावसाळ्याच्या हंगामात पाणी साचून महत्त्वाची दस्तावेज व कागदपत्रे धोक्यात येत होती. गळके छप्पर, उखडलेल्या फरश्या यासह अन्य समस्यांचा सामना या कार्यलयांना करावा लागत होता. आता निधी उपलब्ध झाल्याने कार्यालयांवर येणारी संकटाची मालिका संपुष्टात येणार आहे. मंत्री तनपुरे यांनी अधिक लक्ष घालत निधी उपलब्ध करून दिल्याने सर्व 14 गावातील नागरिकांनी मंत्री तनपुरे यांचे आभार मानले.
0 टिप्पण्या