!! स्वाभिमान !!

गरिबीच्या सावलीतही स्वछंदी वाढलो 
बळीराजासाठी नेहमीच हक्काने लढलो...!
संपत्तीच्या मोहातही सहसा नाही पडलो
अभिमानाच्या शिखरावर कधी नाही चढलो...!!
       मी या काळ्या मातीत घडलो...

धारदार लेखणीतुनही कधी व्यवस्थेवर चिडलो
स्वाभिमानाच्या शोधात अनेकांशी भिडलो...!
थोडयाशा अपयशाने कधीच नाही रडलो 
निंदकांच्या ओझ्याने कधी नाही मोडलो...!!
       मी या काळ्या मातीत घडलो...

सत्याच्या मार्गामुळे कधी नाही अडलो 
स्वार्थाच्या तळ्यातही कधी नाही बुडलो...!
मोठेपणाच्या आवेशात कधी नाही मढलो 
अस्तित्वाच्या बाबतीत कधी नाही कुढलो...!!
       मी या काळ्या मातीत घडलो...

प्रलोभनांच्या दुनियेतही कधी नाही दडलो 
अनुभवाच्या झळांमुळे खरा माणूस घडलो...!
विचारांच्या श्रीमंतीमुळे सामाज्याशी जोडलो 
अन्यायाच्या विरुद्ध समाजकार्यात ओढलो...!! 
       मी या काळ्या मातीत घडलो...

 बाळासाहेब भोर, अ.भा.क्रांतीसेना, संगमनेर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या