चाकुने हल्ला करून मोबाईल चोरी करणारा टोळी प्रमुख गजाआड


स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांसह पाचोड पोलिसांनी केला गुन्हयाचा पर्दापाश

पाचोड/ विजय चिडे : शौचासाठी पाचोड-पैठण रस्त्यालगतच्या शेतात गेलेल्या दोघांजणांना मंगळवारी (ता. २२) अज्ञात चार चोरट्यांनी चाकु हल्ला करून लुटल्याप्रकरणी गुरुवारी (ता.२४) जिल्हा स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांसह पाचोड पोलिसांनी टोळी प्रमुखास गजाआड करुन सदरील गुन्हयाचा पर्दापाश केला.

मंगळवारी ( ता.२२) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास प्रकाश कडूबा औटे व प्रितमकुमार एडके (दोघे रा. दावरवाडी ता.पैठण) हे शौचास जाण्यासाठी मोटार सायकलवरून कुतुबखेडा फाटा येथे आले असता, अनोळखी चार जण मोटारसायकलवरून तेथे आले व त्यांनी तुम्ही इकडे कशाला आलात असे म्हणुन एकाने त्याचेजवळील चाकु काढून प्रकाश औटेच्या डाव्या बाजुला कमरेवर चाकू मारुन, सोबतच्या मित्रासही मारहाण करुन त्यांचे जवळील दोन मोबाईल हॅन्डसेट, हातातील घडयाळ असे एकुण २३ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज जबरीने चोरुन नेला होता. यासंबंधी प्रकाश औटे यांच्या तक्रारीवरून पाचोड पोलीस ठाण्यात ३९४, ३९७, ३४ कलमाखाली अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी घटनेची माहीती मिळताच पाचोड पोलिसांनी सर्वत्र चोरट्याचा शोध घेतला, श्वान पथकही घटनास्थळी आले.

मात्र चोरटे पसार होऊन त्यांचा माग सापडून आला नाही. मात्र शोध घेतांना त्यांना साष्टपिंपळगाव शिवारात बेवारस दुचाकी सापडून आली. त्याची पाहणी व चौकशी केली असता चोरट्यांनी गुन्हयात वापरलेलीच दुचाकी असल्याची खात्री झाली व पोलीस अधीक्षक निमित गोयल यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरचा हा गुन्हा विजय उर्फ मुंढया गौतम पवार (रा. टाकळी अंबड (घेवरी) ता.पैठण) याने त्याचे इतर साथीदारांसह केला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकळी अंबड येथे जाऊन सापळा रचुन विजय उर्फ मुंढया गौतम पवार यास ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदारांसह केल्याची कबुली दिली. दरम्यान त्याने त्याचे साथीदारांसह पैठण पोलीस ठाणेतंर्गत व एम.आय.डी.सी.पैठण अंतर्गत चार चोरी, दरोडयाचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संबंधितास अटक करून त्यास पाचोड पोलीसांच्या स्वाधीन केले. 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निमीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, प्रदीप ठूबे, सहाय्यक फौजदार गजानन लहासे, पोलीस जमादार श्रीमंत भालेराव, महिला पोलीस नाईक रजनी सोनवणे, आनंद घाटेश्वर, संजय तांदळे, योगेश तरमळे, जिवन घोलप यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या