राहुरी / बाळकृष्ण भोसले - महापुरुषांच्या जयंतीतून समाज जागृती बरोबरच समाजप्रबोधन होणे गरजेचे असून महापुरुष जातींच्या गटात न विभागता सर्वसमावेशकतेने व एकत्रितपणे जयंत्या साजऱ्या केल्यास सामाजिक एकोपा तयार होतो, मन जुळतात पर्यायाने गावच्या विकासाला हातभार लागतो. त्या अनुषंगाने चिंचोलीतील शिवजयंती प्रेरणादायी व आदर्शवत असल्याचे प्रतिपादन सरपंच गणेश हारदे यांनी केले. तालुक्यातील चिंचोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रसंगी ते बोलत होते.
नगर-मनमाड महामार्गालगत भव्य शामियाना तयार करून चिंचोलीतील तरुणाईने विचारपीठ तयार केले होते. त्यावर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसोबत समाजाला नेहमीच प्रेरणादायी असलेले माँ जिजाऊ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, मा. राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पुजन करत अनोखी मानवंदना देण्यात आली. भल्या सकाळीच सुवर्णा नलगे यांचेसह अन्य महिलांनी येथे उपस्थित होत विविध प्रकारच्या आकर्षक रांगोळ्या रेखाटत परिसराला जयंतीसंदेशाची रंगसंगती आणून आपणही मागे नसल्याचा संदेश देत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तर चिमुकल्यांनी स्फूर्ती गीत गात महाराजांना अभिवादन केले. फटाक्यांची आतिषबाजी व घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तरुणाई विविध पोषाखात सजल्याने वातावरण भारावले होते. महामार्गावरुन जाणाऱ्या अनेकांनी येथे थांबून या अनोख्या मानवंदनेच्या सजावटीचा क्षण आपल्या भ्रमणध्वनीत चित्रीत करण्यासाठी गर्दी केल्याचे पहावयास मिळत होते. ज्येष्ठ मंडळींसोबत आबालवृद्ध प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महामानवांचे विचार सकल समाजाचा आधार' या प्रेरणादायी प्रबोधनात्मक विचाराने आजच्या तरुणांनी वाटचाल करण्याचे अधोरेखित झाले असल्याचे मत प्रसंगी अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. प्रसंगी हभप श्रीकांत महाराज गागरे, पांडुरंग महाराज पठारे, जालिंदर काळे, पत्रकार बाळकृष्ण भोसले यांची समयोचित भाषणे झाली. गाव व परिसरातील ग्रामस्थ प्रसंगी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सर्जेराव लाटे यांनी केले.
गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भटारकरवस्ती, चिंचोली गावठाण शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, स्व. जनार्दन काळे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातही जयंती साजरी करण्यात आली. यात चिमुकल्यांचा सहभाग लक्षवेधक ठरला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थही यात सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या