राहुरी शहर/अशोक मंडलिक : त्याग मूर्ती रमाई आंबेडकर यांचे जीवन सर्व स्त्री पुरुषांसाठी आदर्श असल्याचे प्रतिपादन केंद्र प्रमुख सौ छाया गायकवाड यांनी केले. त्या संघमित्रा विद्यार्थी आश्रम राहुरी येथे सम्राट प्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या 124 व्या माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की माता रमाई चे जीवन शालिन,चरित्र संपन्न आणि कष्टाळूपणात गेले. त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्ष काळात खंबीर साथ दिली. त्यामुळेच भारताला संविधानाचे विद्वान शिल्पकार लाभले. प्रमुख वक्त्या म्हणून बोलत असताना कवयित्री- साहित्यिक सौ. मनीषा पटेकर यांनी माता रमाई आंबेडकर यांचा जीवन पट उलगडून दाखवला. माता रमाई आंबेडकर यांनी प्रचंड गरिबी अनुभवली. औषधे आणि अन्नपाणी अभावी आपल्या तीन लेकरांना त्यांना गमवावे लागले. त्यांनाही अकाली मरणाला सामोरे जावे लागले. त्यांचे कष्ट, त्याग आणि चारित्र्य आदर्श होते. गुरूकुल सांस्कृतिक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटेकर यांनी माता रमाईच्या जीवनावर गायिलेल्या गीताने उपस्थितांना गहिवरून आले.
डॉ पुनम साबळे -घिगे यांनी माता रमाई जीवन चरित्रा सोबतच आजच्या स्रियांच्या हक्क अधिकार या संदर्भात असलेली उदासीनता प्रखरतेने मांडली. याप्रसंगी राहुरी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.मालती साखरे यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा देत असताना संघमित्रा आश्रम शाळेतील भौतिक सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले. सम्राट प्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की सर्व जयंती कार्यक्रम महिलांनी संपन्न केला.
बार्टी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे समता दूत एजाज पिरजादे यांनी बार्टीच्या उपक्रमांची माहिती देत प्रमुख पाहुण्यांना ग्रंथ भेट दिले. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. कैलास कांबळे यांनीही वसतीगृह आणि प्रमुख पाहुण्यांना लघुउद्योग विषयी स्वलिखित ग्रंथ भेट दिले.
कार्यक्रम प्रसंगी सम्राट प्रतिष्ठान चे अध्यक्ष सत्येंद्र तेलतुंबडे, कार्याध्यक्ष इंजि. बबनराव आहिरे पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिरिष गायकवाड, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे डॉ.जालिंधर घिगे, प्रा. मेघराज बचुटे सेवानिवृत्त प्राचार्य दिलीप कसबे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, वंचित चे निलेश जगधने, रिपब्लिकन सेनेचे निलेश जगधने, बामसेफचे संजय संसारे, मधुकर विधाते, संदीप कोकाटे, पंचशीला तेलतुंबडे, उज्वला विधाते, नम्रता विधाते, भैय्या विधाते आदी उपस्थित होते. शेवटी मा.ग्रामपंचायत सदस्या सौ.अनुराधा अहिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 टिप्पण्या